पर्यटन-दारू येतेय अंगाशी
| चौक | अर्जुन कदम |
खालापूर तालुक्यातील पोखरण सोंडेवाडी येथील धरणात कर्जत येथील युवक बुडून मृत्युमुखी पडला आहे. गेल्या पंधरा दिवसांत हा तिसरा मृत्यू झाला आहे.
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी म्हणजे एक दिवस अगोदर गटारी सेलिब्रेशन व पर्यटन करण्यासाठी कर्जत तालुक्यातील किरवली गावातील पाच तरुण खालापूर तालुक्यातील पोखरण सोंडेवाडी येथील धरणात मौजमजा करण्यासाठी आले होते.
यातील धीरज बडेकर वय वर्षे 25 याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला, ही बाब मित्रांच्या लक्षात आल्यावर स्थानिक लोक व तेथे अन्य पर्यटन व गटारी सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्यांच्या मदतीने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर सुमारे तीन तासाने तो सापडला. त्याला लगेचच कर्जत येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान त्याच ठिकाणी विना मास्क फिरणारे पर्यटक यांच्यावर चौक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला होता. ही जागा चौक-कर्जत रस्त्यावरून सुमारे सात किमी. अंतरावर दुर्गम भागात आहे या ठिकाणी म्हणावे तसे दळणवळण साधन नाही, येथे मोबाईल रेंज देखील मिळत नाही. ही घटना समजताच चौक चे सपोनि. युवराज सुर्यवंशी व त्यांच्या सहकाय्रांनी धाव घेतली. तोपर्यंत धिरजला कर्जत येथील दवाखान्यात नेले होते. याच ठिकाणी 25 जुलै व 30 जुलै रोजी मुंबई येथील दोन युवकांचा जीव गेला असून नढाळ येथील धरणात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. अशा घटना वारंवार घडत असून देखील सुशिक्षित युवक, त्यांचे आईवडील यांना पर्यटन करण्यातच आनंद मिळणार आहे का? मूळात, जागेचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज नसताना, आपल्याला पोहता येत नसताना असे धाडस करून मृत्यू ओढवून घेतला जात आहे. ही अशी ठिकाणे आहेत की येथे पोलीस येईपर्यंत बरेच काही घडून जाते. स्थानिक पोलीस कारवाई करण्यासाठी सक्षम आहेत. पण त्यांनाही नियम आहेत, मर्यादा आहेत. हा परिसर दूर आहे, चौक पोलीस दूरक्षेत्र परिसरात दुर्गम, डोंगराळ भाग, चौक रेल्वे स्थानक, पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग, मोठी बाजारपेठ, राष्ट्रीय महामार्ग क्र.4 या ठिकाणी काहिनाकाही घडत असते, येथील पोलीस यंत्रणा सक्षम आहे, पण पोलीस बळ नाही. ही बाब आता पर्यटकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.