शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या आरोपीच्या शोधात उरण पोलीस
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील देवकृपा चौकात सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोल ओतून गॅरेजचा कचरा जाळू नकोस, आग सगळीकडे पसरेल, अशी समज देणाऱ्या भेंडखळ येथील गणेश पाटील (55) यांना सिडकोच्या फूटपाथवर बेकायदेशीरपणे गॅरेज चालविणाऱ्या आरोपी रोहित खाडे याने त्याच्या साथीदारांसह तिघांनी मारहाण, शिवीगाळ करीत धारदार चाकूचा धाक दाखवित जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिघे आरोपी सध्या फरार असून, त्यांच्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी रोहित राजू खाडे, रा. द्रोणागिरी नोड, सेक्टर-50 हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पेट्रोलचे काही थेंब गणेश पाटील यांच्या पायावर पडले व बाजूला उभ्या मोटारसायकलवरसुद्धा उडाले. हे जाणवताच आग सगळीकडे पसरेल म्हणून गणेश पाटील यांनी रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला.
या गोष्टीचा राग आल्याने आरोपी रोहित याने तक्रारदार गणेश पाटील यांना शिवीगाळ करीत असताना बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी रोहित तक्रारदार गणेश पाटील यांना धक्काबुक्की करू लागला. त्याठिकाणी रोहितचे वडील राजू कंदा खाडे आणि त्यांचे काका गणेश कंदा खाडे हेही त्या ठिकाणी येऊन तक्रारदार गणेश पाटील यांना मारहाण करू लागले. या दरम्यान रोहितने धारदार चाकू काढून तक्रारदार गणेश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तक्रारदार गणेश पाटील लगेचच त्यांच्या कारमध्ये बसून दरवाजे बंद करून घेतले असतानाही रोहितने गाडीच्या काचेवर चाकूने प्रहार केल्याची घटना उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील देवकृपा चौकात घडली आहे. याबाबतची तक्रार गणेश हरिश्चंद्र पाटील, रा. भेंडखळ यांनी तात्काळ उरण पोलीस ठाण्यात केली आहे. यामध्ये रोहित राजू खाडे, राजू कंदा खाडे व गणेश कंदा खाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे हे करीत आहेत.