| पनवेल | वार्ताहर |
जबरी चोरी करणाऱ्या तिघा जणांच्या एका टोळीस पनवेल गुन्हेशाखा कक्ष 3 पथकाने जेरबंद करून या टोळीकडून 2 गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे. प्रथमेश तरे (24), रा. विचुंबे, समीर पेडणेकर (26), रा.विहिघर व साहिल खैरे (23), रा. विचुंबे अशी याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे असून, या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कळंबोली पोलीस ठाणे हद्दीमधील कळंबोली सिग्नल या ठिकाणी स्कुटीवरून आलेल्या तीन इसमांनी सिमेंट बल्कर चालकास वस्तरा दाखवून त्याचेकडे पैशांची मागणी करुन त्याच्याकडील वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन जबरीने चोरी करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वात सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा. रमेश शिंदे, प्रमोद राजपुत, निलेश पाटील व इतर आदींच्या पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक तपास, सीसीटिव्ही फुटेज, गोपनिय बातमीदार व मानवी कौशल्याचा वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणत उपरोक्त तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.







