जैन साध्वींसह दोघींचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
| कर्जत | प्रतिनिधी |
सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास खोपोलीहून कर्जतला आलेल्या चार जैन साध्वी व त्यांच्याबरोबर असलेल्या जैन महिला अशा एकूण बारा जणी कर्जतहून नेरळकडे जात असताना मागून सुसाट येणाऱ्या दुधाच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्या टेम्पोने तिघींना अक्षरशः चिरडले. यामध्ये एक जैन साध्वी व एक जैन महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक भगिनी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या जैन महिलेला पुढील उपचारासाठी पनवेलकडे नेण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे कर्जत परिसरात शोककळा पसरली असून, जैन बांधवांची दुकाने सोमवारी दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. धडक देऊन पळून चाललेल्या टेम्पो चालकाला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी पहाटे कर्जतहून चार जैन साध्वी नेरळकडे जात होत्या. त्यांच्याबरोबर काही जैन महिलाही होत्या. यापैकी मौलिकपूर्णा श्रीजी, लता ओसवाल-हिंगड, दिवाली ओसवाल या कर्जत-कल्याण मार्गावरील वांजळे गावानजीक पुढे चालत जात असता मागून भरधाव येणाऱ्या दुधाच्या टेम्पोने या तिघींना जोरदार धडक दिली. या धडकेने मौलिकपूर्णा श्रीजी (51) आणि लता ओसवाल-हिंगड (35) यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिपाली ओसवाल (36) या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या ओसवाल यांना पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील गांधी हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मागून येत असलेल्या तीन जैन साध्वी व जैन महिला सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. धडक देऊन पळून चाललेल्या टेम्पो चालकाला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड अधिक तपास करीत आहेत.
ही घटना समजताच कर्जत तालुक्यात शोककळा पसरली. विशेषतः जैन बांधवांना या घटनेचा धक्का बसला. अनेक जैन बांधव घटनास्थळी जमले, त्यांनी मृत झालेल्या जैन साध्वी व ओसवाल-हिंगड यांना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यानंतर त्यांना जैन धर्मशाळेत आणून त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी करून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कर्जत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी सभापती नारायण डामसे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किरण ठाकरे, नगरसेवक विवेक दांडेकर, व्यापारी फेडरेशनचे मयूर जोशी आदींसह जैन बांधव-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.