| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-चिपळूणदरम्यान एक्सेल फाटा परिसरात रविवारी पहाटे धावत्या कारला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. पहाटे सुमारे पाचच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर काही क्षणातच कारने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारच्या पुढील भागातून अचानक धूर आणि आगीचे लोळ उठू लागले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वाहनातील सर्व प्रवासी तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही मिनिटांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहत येथील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंत कार पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले होते. आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटेच्या वेळी होणारी डुलकी आणि वेग यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






