जिल्ह्यात 8,979 हंड्या फुटणार
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबागमध्ये तसेच रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये शनिवारी दुपारपासून दहीहंडीचा उत्सव सुरु होणार आहे. आठ हजार 979 दहहंड्या फोडल्या जाणार आहेत. यानिमित्ताने 355 ठिकाणी मिरवणुका काढून उत्सव साजरा केला जाणार आहे.
दहीहंडीचा उत्सव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. आयोजकांमार्फत त्याची तयारी करण्यात आली आहे. गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडी उत्सवामध्ये पुरुष गोविंदा पथकांसह महिला गोविंदा पथकांचा समावेश असणार आहे. शेकाप पुरस्कृत दहीहंडीचा थरार शनिवारी दुपारपासून सुरु होणार आहे. दहीहंडी स्पर्धेसाठी 53 गोविंदा पथकाने सहभाग नोंदविला आहे. त्यात महिला गोविंदा पथक 25 आणि पुरुष गोविंदा पथक 28 आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे. अंतिम विजेत्या महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे 51 हजार 111 रुपये व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी 33 जणांनी नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले. अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ दहीहंडी फोडणाऱ्या शहरातील पुरुष व महिला गोविंदा पथकाला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील पुरुष गोविंदा पथकाने दहीहंडी फोडल्यास त्या पथकाला एक लाख रुपये आणि महिला गोविंदा पथकाला 50 हजार रुपयांचे अतिरिक्त पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
साध्या वेशात असणार पोलीस
रायगड जिल्ह्यामध्ये नऊ हजार दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. त्यामुळे याठिकाणी प्रचंड गर्दी होणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी महिला, पुरुष, तरुण मंडळी, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. प्रत्येकाच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून साध्या वेशात गर्दीमध्ये पोलीस तैनात राहणार आहेत.
दीड हजार पोलिसांचा पहारा
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जिल्ह्यात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 950 पोलीस कर्मचारी, 350 होमगार्ड, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 73 वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी या कालावधीत असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गोविंदा पथकांमार्फत थर उभारून दहीहंडी फोडली जाणार आहे. गोविंदा पथकांनी सुरक्षेचा विचार करून हा उत्सव साजरा करावा. आयोजकांनी योग्य पद्धतीने नियोजन करून आनंदमय वातावरणात हा उत्सव साजरा करावा. गैरप्रकार होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
आंचल दलाल,
पोलीस अधीक्षक, रायगड





