माथेरानमध्ये अश्व शर्यतींचा थरार

सर्वोत्कृष्ट घोडेस्वार मुर्तुझा मोरबीवाला ठरला

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील ज्येष्ठ अश्वपालक स्व. खलील महाबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हैदर महाबळे यांनी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपच्या माध्यमातून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे शनिवार दि. 20 व रविवार 21 रोजी भव्य अश्वशर्यतींचे आयोजन केले होते. त्यास स्थानिक तसेच मुंबईमधील अनेक घोडेस्वारांसह प्रेक्षकांनी, पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या दिवशी झिग झ्याग रेस, ट्रॉटिंग रेस (पर्यटकांसाठी) बॉल एन बकेट, बटन रेस, गलेपिंग गोल्फ ऑन हॉर्स बॅक (पर्यटकांसाठी),कॅरिंग द बलून (पर्यटकांसाठी) मुलांसाठी ट्रॉटिंग रेस, टग ऑफ वॉर खुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दि.21 रोजी आदिवासी लोकांसाठी धावण्याच्या शर्यती, टेरिट रॅगिंग खुली स्पर्धा, मुजिकल मग ऑन हॉर्स बॅक (पर्यटकांसाठी), रिले ट्रॉटिंग रेस स्थानिक व पर्यटकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुंबई येथील घोडेस्वार मुर्तुझा मोरबीवाला सर्वोत्कृष्ट घोडेस्वार ठरला. उपविजेता यश शिंदे यानेही उत्तम कामगिरी बजावली. अँमेझॉन अश्वाने सलग दोन वर्षे चॅम्पियन हॉर्स होण्याचा मान पटकावला. स्पर्धेचे पंच म्हणून येथे लक्ष्मण कदम, वसीम महाबळे, किरण जाधव यांनी काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी माथेरानचे स्थानिक अश्वपाल हैदर महाबळे आणि मुंबईचे अश्वप्रेमी करन संघवी यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version