ठाण्यात रंगणार आयपीएलचा थरार

| मुंबई । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2023 साठी बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन चे नियोजन सुरू केले आहे. अशातच आयपीएलच्या स्पर्धा आता ठाण्यात रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत दिले आहेत.

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात आयपीएलचे सामने घेण्याची आ. प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. बीसीसीआयच्या नियमावलीनुसारच येथील खेळपट्टी तयार करण्यात आली असल्यामुळे येत्या काळात आयपीएलचे सामने होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. ठाण्यात पंचतारांकित हॉटेल उपलब्ध झाल्याने भविष्यात आयपीएल सामने ठाण्यात रंगतील व खेळाडू ठाण्यात वास्तव्य करतील, असे मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्यात आयपीएलचा थरार रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे.

महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात बीसीसीआयच्या नियमावलीनुसार खेळपट्टी नव्हती. यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रिकेट सामने होत नव्हते. ही उणीव भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आता महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे.

नव्या खेळपट्टीमुळे 25 वर्षांनंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने अलीकडेच येथे पार पडले. याच मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला होता. नव्या खेळपट्टीमुळे मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळविणे शक्य झाले असले तरी आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलचे सामने खेळविण्याकरिता मैदानात अत्याधुनिक दिव्यांची व्यवस्था असणे गरजेचे असल्यामुळे पालिकेने मैदानात तशी विद्युत व्यवस्था उभारणीचे काम सुरू केले आहे.

Exit mobile version