नागावमध्ये रंगणार कबड्डीचा थरार

रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
पुरुषांचे 256, तर महिलांचे 16 संघ घेणार सहभाग
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निखिल मयेकर मित्रमंडळ नागाव यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ गट (पुरुष व महिला) रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दि. 26 ते 30 नोव्हेंबरदरम्यान नागाव सं.म. हायस्कूल मैदानावर करण्यात आले आहे. यामध्ये पुरूष गटाचे सामने पाच दिवस असून, फक्त महिला गटाचे सामने शेवटच्या दिवशी खेळविण्यात येणार आहेत.

दरम्यान, या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असो. अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी आ. पंडित पाटील, नागाव ग्रा.पं. माजी सरपंच नंदकुमार मयेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पाच दिवसीय या स्पर्धेत पुरुषांचे जवळपास 256, तर महिलांचे 16 संघ सहभागी होणार असून, 272 सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे.

या स्पर्धेतील खळाडूंची कामगिरी पाहून रायगड जिल्हा पुरूष कबड्डी संघ निवडण्यात येईल. हा संघ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होईल. रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून संभाव्य 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबिरानंतर पुरुषांच्या आणि महिलांच्या अंतिम 12 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निखिल मयेकर मित्रमंडळ मेहनत घेत आहेत.

असे आहे नियोजन
या स्पर्धेसाठी नागाव येथील सं.म. हायस्कूल मैदानावर भव्य मंडप, चार मैदाने तर प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य बाल्कनी तयार करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील बचत गटांना यावेळी स्टॉल लावण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कबड्डीप्रेमी उपस्थित राहणार असल्यामुळे वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कामासाठी विविध कमिट्या नेमण्यात आल्या आहेत.

कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने नागावमधील सर्वच जण एकवटून कामाला लागले आहेत. स्पर्धेदरम्यान विविध क्षेत्रातील नामवंत व कर्तृत्ववान व्यक्तींना बोलविण्यात आले आहे. नागावमधील सर्व क्रीडामंडळ व नागरिकांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे. आलेल्या प्रेक्षक व खेळाडूंसाठी खाऊगल्ली तयार करण्यात आली आहे.

निखिल मयेकर, सरपंच नागाव
Exit mobile version