| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आग्राव पुर्वपाडा दर्यासागर मित्रमंडळाने गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.20) शिडांच्या होंड्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही परंपरा त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. कोळी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कार्लाच्या डोंगरातील एकविरा मातेला नवसाचा नारळ पुर्वी कुंडलिका समुद्रखाडीमार्गे भिसे खिंडीतून पालखीने पोहोचविला जात असे. त्यातूनच या शिडाच्या होड्यांच्या शर्यतींचा जन्म झाला.
एकविरा मातेच्या या नवसाचा नारळ ओटीसह पालखी असंख्य होड्यांसह कुंडलिका समुद्र खाडीमार्गे सुद्धा जात असत. बदलत्या काळात दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधेने एकविरा मातेचा नवसाचा नारळ व ओटीचा मार्ग बदलला. मात्र, नवसाचा नारळ व ओटी पोहोचविण्यासाठी सुरू झालेली शिडवाल्या होड्यांची परंपरा शर्यतीद्वारे आजमितिस सुरू आहे. कोळी बांधव या दिवशी होंड्यांना रंगबिरंगी पताकांनी सजवून आप्त व मित्रमंडळीस कुंडलिका साळाव समुद्र खाडीत यांत्रिक होंड्यासह मौजमज्जेची लयलूट करतात. या दिवशी रेवदंडा, कोर्लई, बोर्ली, थेरोंडा पंचक्रोशीतीत कोळी बांधवाच्या यांत्रिक होंड्या मोठ्या संख्येने समुद्र खाडीत येतात. तसेच, स्थानिकांसह पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने या शिडवाल्या होंड्यांच्या शर्यतीचा आनंद घेतात.






