स्थानिकांच्या रोजगाराला मोठी चालना
| पाली/बेणसे | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. कुंडलिका या वेगवान वाहणाऱ्या नदीत रिव्हर राफ्टिंगचा थरार पर्यटकांकडून अनुभवला जात आहे. साजे ते कामत असा 12 किमीचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कोलाडमध्ये दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी तज्ज्ञ अनुभवी मार्गदर्शक व खास बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिनधास्तपणे अनुभवत आहेत.
हिरवाईने नटलेल्या कोलाडमध्ये रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळी-वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे. 18 वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो. कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते. कोलाडमधील कुंडलिका नदीतील रिव्हर राफ्टिंगचा थरार महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आहे. येथे येणारे पर्यटक या ऍडव्हेंचरचा आनंद घेतात, जिथे त्यांना वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून राफ्टिंगचा अनुभव मिळतो.
रिव्हर राफ्टिंगसाठी कोलाडला पसंती
कोलाडमधील रिव्हर राफ्टिंग एक रोमांचक अनुभव असतो, जो निसर्गाच्या सान्निध्यात येतो. आता कोलाडच्या रिव्हर राफ्टिंगकडे पर्यटकांची पाऊले वळाली असून येथे पर्यटकांची मोठी गर्दी उसळत आहे. थरार, साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळत आहे. पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन सुखावत आहेत. पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटक देखील ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात. सध्या राज्यभरातील पर्यटक आपल्या मित्र परिवारासह कुटुंबासोबत येथे दाखल होत असल्याने स्थानिकांच्या रोजगाराला देखील मोठी चालना मिळत आहे.
आम्ही खूप कोलाडमधील कुंडलीका नदीवरील रिव्हर राफ्टिंगबद्दल ऐकून होतो. आम्ही 12 ते 13 लोक या ठिकाणी आलो होतो. या रिव्हर राफ्टिंगमध्ये मौजमजेसह खूप थरार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली सुरक्षा यंत्रणा वाखाणण्याजोगी आहे. मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या कोलाड येथे राफ्टिंग सुविधा असल्याने सर्वांनी या ठिकाणी येऊन थरारा अनुभवला पाहिजे.
हसमुख शेलार,
पर्यटक, मुंबई
आपल्या कोकणात निसर्गाच्या सानिध्यात अतिषय सुंदर रिव्हर राफ्टिंगची व्यवस्था आहे. अतिशय सुरक्षित व तज्ज्ञ मार्गदशकांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले. थरारक रॅपिड होते, आम्ही खूप मज्जा घेतली. धम्माल आली. प्रत्येकाने एकदा तरी या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला पाहिजे.
डॉ. हमदूले,
पर्यटक







