| अहमदनगर । प्रतिनिधी ।
अहमदनगर विरुद्ध हिंगोली, मुंबई शहर विरुद्ध रायगड अशा पुरुषांत, तर कोल्हापूर विरुद्ध अहमदनगर, पुणे विरुद्ध परभणी अशा महिलांतील लढतीने 70व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपदाचे बिगुल वाजणार. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने दि. 27 ते 30 डिसेंबर या कालावधित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाडिया पार्क क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक, टिळक रोड येथे सहा मॅटच्या क्रीडांगणार हे सामने खेळविण्यात येतील.
या स्पर्धेचे उदघाटन नगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते मंगळवार (दि.27) सायंकाळी 4 वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेतूनच महाराष्ट्राचा पुरुष व महिला गटाचा संघ निवडण्यात येणार असून हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. यामुळेच प्रो-कबड्डी गाजविणार्या खेळाडूंचा खेळ नगरकरांना जवळून पहाण्याची संधी मिळणार आहे. सामने दिलेल्या वेळेत सुरू करणे व वेळेत संपविण्याकरिता आयोजकांनी कंबर कसली आहे. कबड्डीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खेळाडूंच्या व्यवस्थेत कोणतीही कसर राहू नये म्हणून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्टवोट या यु-ट्यूब वाहिनीवर करण्यात येणार आहे.