| पुणे | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी व आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा पिंपरी चिंचवड-बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत सुरू आहेत. या स्पर्धेतील कुमार विभागात अहमदनगर, परभणी, पुणे ग्रामीण व ठाणे ग्रामीण संघ तर कुमारी विभागात पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, सांगली व पालघर संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.
मुलांच्या उपांत्य पुर्व फेरीत अहमदनगर संघाने पालघर संघावर 50-30 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला अहमदनगर संघाकडे 30-18 अशी आघाडी होता. अहमदनगरच्या वेदांत उंदरे, अभिजित साळुंखे यांच्या आक्रमक चढाया व शिवम गोरडे आणि महेंद्र परदेशी यांच्या पकडींमुळे अहमदनगर संघाने सहज विजय मिळविला. त्यानंतर पाच पाच चढायांमध्ये अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने कोल्हापूर संघावर 35-34 असा एक गुणांनी विजय मिळविला. तर, परभणी संघाच्या बाबुराव जाधव, रमेश गायकवाड यांच्या चढाया व अंकुश भांडे व अतुल जाधव यांच्या पकडींच्या जोरावर रत्नागिरी संघावर 48-17 अशी एकतर्फी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. परभणी संघाने पहिल्या डावात दोन व दुसऱ्या डावात एक लोन लावत 29-6 अशी आघाडी घेतली होती.
मुलींच्या पहिल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने ठाणे शहर संघावर 45-30 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे 26-8 अशी भक्कम आघाडी होती. दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात सांगली संघाने मुंबई उपनगर पूर्व संघावर 26-22 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सांगली संघाकडे 16-7 अशी आघाडी होती.







