थरार उपांत्य फेरींचा

भारत थेट अंमित सामन्यात?

। गयाना । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवण्यात आलेली ही स्पर्धा अनेक गोष्टींमुळे ऐतिहासिक ठरली. यंदा पहिल्यांदाच टी-20 विश्‍वचषकात 20 संघ सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक धक्कादायक निकालही या स्पर्धेत पाहायला मिळाले, तर बर्‍याच बलाढ्य संघाचे आव्हानही लवकर संपले. यात पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा काही संघांचा समावेश आहे. दरम्यान, आता या स्पर्धेतील अंतिम 4 संघ मिळाले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत.

उपांत्य फेरीतील संघांची कामगिरी उपांत्य फेरीत पोहचलेल्या चार संघांपैकी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आत्तापर्यंत अपराजित आहेत. भारताने पहिल्या फेरीत तीन सामने जिंकले होते. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर, सुपर-8 मधील तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या फेरीतील चार आणि सुपर-8 फेरीतील तीन असे सलग 7 सामने जिंकले आहेत.

लढवय्या अफगाणिस्तानने अनेक मोठ्या संघांना पाणी पाजत पहिलांदाच सेमीफायनल गाठली आहे. अफगाणिस्तानने पहिल्या फेरीत तीन विजय आणि एक पराभव पाहिला होता. तसेच, सुपर-8 फेरीत तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, तर एक पराभव स्विकारला लागला होता. गतविजेत्या इंग्लंडनेही सुरुवातीच्या संघर्षानंतर चांगली लय पकडली आहे. इंग्लंडने पहिल्या फेरीत चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच, एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. सुपर-8 फेरीत इंग्लंडने तीन सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आणि 1 सामना पराभूत झाले आहेत.

अशी रंगणार उपांत्य फेरी
आता या स्पर्धेतील अंतिम 4 संघ निश्‍चित झाल्याने उपांत्य फेरीत कसे सामने होणार हेदेखील स्पष्ट झाले आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तौरोबाला होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी (दि.27) पहाटे 6 वाजता सुरू होणार आहे. तर, दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात गयानाला रंगणार आहे. हा सामनाही गुरुवारीच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना गयानामध्ये होत असून हवामानाचा अंदाजानुसार पुढील आठवडाभर येथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसेच गुरूवारी ही गयानामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. सामना सुरू असताना हवामान चांगले राहण्याची अपेक्षा असली तरी सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाल्यास मैदान ओले असल्याने खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. यामुळे हा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.
सामना रद्द झाला तर?
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, आयसीसीने जाहीर केले होते की त्याच दिवशी दुसरा उपांत्य सामना आयोजित करण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जातील आणि या प्रयत्नात दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला आहे. हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तरी भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारतीय संघाने सुपर-8 मध्ये इंग्लंडपेक्षा जास्त गुण मिळवले होते. त्यामुळे भारताला याचा फायदा होणार आहे.
Exit mobile version