परभणीत रंगणार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार!

। मुंबई । प्रतिनिधी ।
यजमान परभणी विरुद्ध नांदेड आणि गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांच्यात किशोर, तर गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर यांच्यात किशोरी गटातील रंगतदार सामन्याने 32व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला आजपासून प्रारंभ होईल. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या अधिपत्याखाली परभणी जिल्हा कबड्डी असो. साई क्रीडा मंडळ-खेडूला यांच्या सहकार्याने दि.20 ते 22 डिसेंबर या कालावधीत खेळविण्यात येणार आहे.
गेली जवळपास दोन वर्षे कोरोनामुळे खीळ बसलेल्या कबड्डी स्पर्धेला यामुळे पुन्हा एकदा नवी झळाळी मिळणार आहे. या स्पर्धेत सर्व म्हणजे 25 जिल्ह्याच्या मुलांच्या, तर 22 जिल्ह्याच्या मुलींच्या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. गतवेळी मुलींच्या गटात 24 जिल्ह्याच्या संघांनी सहभाग घेतला होता. यंदा ही संख्या दोनने कमी झाली आहे. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात खेळविण्यात येतील. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडानगरी, जायकवाडी वसाहत येथे होणार्‍या या स्पर्धेकरिता 4 मातीची क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 6-00वाजता आ. बाबाजानी दुर्ररानी यांच्या हस्ते होणार आहेत. या स्पर्धेची गटवारी जी तांत्रिक समितीने तयार केली ती राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील आणि संयोजन समितीचे प्रमुख मंगल पांडे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली.

किशोर गट विभागणी:-
1)अ गट :- 1)ठाणे, 2)सातारा, 3)सोलापूर.2)ब गट :- 1)पुणे, 2)सिंधुदुर्ग, 3)पालघर.3)क गट :- 1)परभणी, 2)नांदेड, 3)जालना.4)ड गट :- 1)मुंबई उपनगर, 2)नंदुरबार, 3)लातूर 5)इ गट :- 1)कोल्हापूर, 2)औरंगाबाद, 3)उस्मानाबाद. 6)फ गट :- 1)अहमदनगर, 2)सांगली, 3)बीड. 7)ग गट :- 1)रायगड, 2)मुंबई शहर, 3)नाशिक. 8) ह गट :- 1)रत्नागिरी, 2)जळगांव, 3)हिंगोली, 4)धुळे.
किशोरी गट विभागणी :-1)अ गट :- 1)मुंबई उपनगर, 2)औरंगाबाद, 3)पालघर. 2)ब गट :- 1)परभणी, 2)मुंबई शहर, 3)लातूर. 3)क गट :- 1)रायगड, 2)सोलापूर, 3)धुळे. 4)ड गट :- 1)कोल्हापूर, 2)सातारा, 3)अहमदनगर. 5)इ गट :- 1)ठाणे, 2)रत्नागिरी, 3)जळगांव. 6)फ गट :- 1)सिंधुदुर्ग, 2)नाशिक, 3)हिंगोली. 7)ग गट :- 1)पुणे,, 2)सांगली, 3)उस्मानाबाद, 4)बीड.

Exit mobile version