बदलापूरमध्ये व्हॉलीबॉलचा थरार

| बदलापूर | प्रतिनिधी |

क्रीडा व युवक सेवा संचालनालय कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन येथील जिमखाना मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत यजमान मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरने विजयी हॅटट्रिकसह उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्या या स्पर्धेत 21 वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबईने सलग तिसरा विजय संपादन केला. शेवटच्या साखळी लढतीत मुंबईने लातूर विभागाचा 25-14, 25-11 गुणांनी पराभव करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. उपांत्य फेरीत गटात अव्वल ठरलेल्या मुंबईची नागपूरशी लढत रंगणार आहे. या गटातील दुसरी उपांत्य लढत नाशिक विरूद्ध पुणे विभागात होणार आहे. गतविजेत्या नाशिक संघानेही 3 सामने जिंकून विजेतेपदाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. 21 वर्षांखालील मुलांच्या गटात गतविजेत्या लातूरने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली. कोल्हापूर, संभाजीनगर पाठोपाठ अमरावतीला लोळवून लातूर गटात अव्वल ठरला. अटीतटीच्या तिसऱ्या साखळी सामन्यात लातूरने अमरावतीला 25-20, 25-21 गुणांनी पराभव करीत आव्हाप संपुष्टात आणले. लातूरची उपांत्य फेरीत नागपूर विरूद्ध आमनासामना होणार आहे. मुलांच्या 18 वर्षांखालील गटात नागपूरने मुंबईला तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बाजी मारली. तिसऱ्या साखळी लढतीत पहिला सेट नागपूरने गमवला होता. दुसऱ्या सेटमध्ये तुफानी खेळ करीत विजय खेचून आणला. 24-25, 25-21, 15-10 गुणांनी नागपूरने मुंबईचे उपांत्य फेरीतील स्वप्न धुळीस मिळवले. उपांत्य फेरीत नागपूरची पुणे विरूद्ध झुंज होईल. मुलींच्या 18 वर्षांखालील गटात पुणे संघाने गटात अव्वल स्थान प्राप्त केले. तिसऱ्या साखळी लढतीत नागपूरचा 25-11, 25-7 गुणांनी धुव्वा उडवित उपांत्य फेरीत धडक मारली आहे. गतविजेत्या लातूर संघाने 18 वर्षांखालील मुलींच्या गटात पराभवानंतर तिसरा साखळी सामना जिंकत उपांत्य फेरीचा पल्ला पार केला. उपांत्य फेरीत पुणे विरूद्ध लातूर ही एक चुरशीची लढत रंगणार आहे.

Exit mobile version