रेवदंड्यात रंगणार कुस्त्यांचा थरार

65 वर्षाची परंपरा कायम

। अलिबाग | प्रतिनिधी ।
चौल-रेवदंडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने जंगी कुस्त्यांचा थरार रेवदंड्यात पहावयास मिळणार आहे. रविवार (दि.12) रोजी दुपारी तीन वाजता ही स्पर्धा हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश खोत, शरद वरसोलकर, हेमंत गणपत यांनी दिली. दिपावली व लक्षीपुजनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ शेकापचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने गेल्या 65 वर्षाची परंपरा जपत स्थानिक कुस्ती मल्लांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत मांडव्या पासून रामराज, वाडगाव, ताजपूर, आंदोशी अशा अनेक भागातील मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही स्पर्धा नारळावर होणार आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या आखाड्यास चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विजयी मल्लाचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Exit mobile version