उधाणामुळे 23 घरांत पाणी; लाखो रुपयांचे नुकसान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग शहापूर व धेरंड गावात उधाणाचे पाणी घूसून 23 घरांचे तर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळेत मत्स्य तलावात पाणी शिरून मासे वाहून गेले आहेत. जमीन गाळाची असल्याने घरांचेही नुकसान होत आहे. बांधाची कायमस्वरूपी दुरुस्ती करायची असेल तर पोहोच रस्ते प्रथम करावे लागतील, त्यांनी सुचविले. कारण मूळ संरक्षक बंधारे हे मुख्य रस्त्यापासून 1 ते 2 किमी दूर आहेत व तेथे पक्के मटेरियल जाण्यासाठी पोहोच रस्ते हि प्राथमिक गरज आहे. पण त्याकडे 2 वर्ष दुर्लक्ष करण्यात आले.


तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी पोहोच रस्ते करण्यासाठी मोठी मोहीम घेतली होती पण त्यांची बदली झाल्याने ते पूर्णत्वास गेले नाही. 2021 ला शहापूर पूर्व बाजूस बंधारा फुटला. त्यावेळी तेव्हा पुन्हा मटेरियल कसे न्यायचे, हा प्रश्‍न निर्माण झाल. पोहोच रस्ता नसल्याने हि खांड आता 130 मिटर लांब व 7 मीटर खोलीची झाली आहे. दरम्यानच्या काळात जेएसडब्ल्यू कंपनीच्या सहकार्याने पोहोच रस्ता होऊ शकतो, असे तहसीलदार मीनल दळवी यांच्या लक्षात आणून दिल्यावर तसे ठरले. मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही.


या पार्श्‍वभूमीवर दिनांक 30 मे 2022 रोजी एमआयडीसीचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर व श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांचे समवेत बैठक होऊन संपूर्ण बांध पूर्णत्वास करण्याचे ठरले. त्या अनुशंगाने खारभूमी विभागाने अंदाजपत्रक बनवावे, असे ठरले. त्यानुसार खारभूमी विभागाने पोहोच सहित 11.81 कोटीचे अंदाज पत्रक एमआयडीसीला सादर केले.


दरम्यानच्या काळात पाणी थांबत नाही म्हणून तातडीची उपाययोजना करण्यासाठी 30 ऑगस्ट 2022 रोजी श्रमिक मुक्ती दल व विभाग प्रमुख यांचे सहित अप्पर जिल्हाधिकरी यांचे समवेत बैठक झाली. आज त्यास 5 महिने होऊन देखील कृती झाली नाही. दर आमावस्या पौर्णिमेला पाणी आहे. मत्स्य तलाव, घरे, झाडे पाण्याखाली जात आहेत. जमिनी नापीक होत आहेत. त्यात कांदळवन वाढत आहे. आमदार जयंत पाटील यांनीही पोहोच रस्त्यास पाठींबा दिलेला आहे.

होळीचे उधाण दीडपट मोठे
पुढचे होळीचे उधाण या पेक्षा दीडपट मोठे आहे. पाणी नेमके रात्री जास्त येते. किमान 500 एकर जमीन जी संपादनामध्ये नाही ती देखील नापीक होणार आहे. महिला वर्ग संतप्त झाला आहे. प्रशासनाच्या बैठकांवर जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. कायदा सुव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजन भगत यांनी व्यक्त केले आहे.


वयोवृद्ध जोडप्याच्या घराचे नुकसान
निवृत्त शिक्षक प्रभाकर नारायण पाटील व कुसुम (वय 82) यांच्या घरात पाणी शिरून कागदपत्रे तसेच 1 लाख रुपये भिजले. तसेच घरातील वस्तूंचे खूप नुकसान झाले आहे.


प्रशासकिय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
1 ऑगस्ट 2021 रोजी फुटलेला बंधारा 560 दिवस झाले तरी बांधला नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा बंधारा 130 मिटर लांब व 7 मिटर खोल झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी घुसतआहे. या जमिनीची मालकी एमआयडीसीची आहे. ज्या गावांची जमीन संपादित केली त्या गावांचे खार बंधारे एमआयडीसीने 2006 ते 2019 पर्यंत ताब्यात घेतले नव्हते. तसेच खासगी खारभूमी असल्याने खारभूमी विभाग त्यावर खर्च करू शकत नाही. त्यावर श्रमिक मुक्ती दलांने 23/12/2019 रोजी अंधेरी येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासोबत बैठक खार बांधाची जबाबदारी पहिल्यांदा 10 वर्षानंतर एमआयडीसीने स्वीकारली.

Exit mobile version