दिवाळीनंतरच निवडणुकांचा बार
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार हे निश्चित झाल्याने पुढील काळात राजकीय वातावरण तापणार आहे.
राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यात या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरली जाणार नाही, निवडणुका टप्प्या-टप्प्यानं होणार आहेत, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.
सोमवारी नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली होती. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आगानी निवडणूका नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह घोण्यास मंजुरी मिळाली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या माहापालिका नाशिक महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, मुंबई महापालिका यांच्या प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते. मात्र नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या काही याचिका कोर्टात सादर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता राज्यात नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका पार पडणार आहेत.
मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका
मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.मुंबईमध्ये आधीही 227 प्रभाग होते. महाविकास आघाडीचे सरकारआल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये आता 227 प्रभाग असणार आहेत.
या महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग
अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत. ‘अ' वर्ग महानगरपालिका पुणे, नागपूर, ‘ब' वर्ग महानगरपालिका ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, ‘क' वर्ग महानगरपालिका नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर, कल्याण-डोंबिवली.






