चालक-वाहकांच्या कमतरतेचा बसफेऱ्यांना फटका
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
एसटी महामंडळोच श्रीवर्धन आगार हे अत्यंत जुने असून, मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. एकेकाळी जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या आगारांमध्ये श्रीवर्धन आगाराचा समावेश होता. मात्र, सध्या आगाराची परिस्थिती काहीशी बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
चालक-वाहकांच्या बदल्या, सेवानिवृत्ती तसेच रिक्त पदांवर नवीन कर्मचारी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे सध्या सुमारे 10 ते 15 कर्मचारी कमी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या श्रीवर्धन आगाराकडे 40 चालक, 22 वाहक व 101 चालक-वाहक असे एकूण 163 कर्मचारी कार्यरत आहेत.
कर्मचारी संख्येच्या कमतरतेमुळे गाड्या वेळेवर सुटण्याचा परिणाम होत असून, कार्यरत चालक-वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचेही दिसून येत आहे.
आगारातील बससंख्येचा विचार करता सध्या 28 साध्या बसेस, यामध्ये 10 सीएनजी व उर्वरित डिझेल, 6 शिवाशाही बसेस, 8 स्लीपर कोच, खासगी कंपनीच्या 14 बसेस तसेच नव्याने दाखल झालेल्या लालपरीच्या 5 बसेस असा एकूण 56 बसेसचा ताफा आगाराकडे आहे.
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आगाराच्या नियमिततेवर परिणाम करत असल्याने, बदली किंवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्यास श्रीवर्धन आगारातील अनेक समस्या मागी लागू शकतील, अशी अपेक्षा प्रवासी व स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.






