प्रवाशांचा संताप, आंदोलनाचा इशारा
| चणेरा | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या रोहा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले अत्याधुनिक स्वच्छतागृह रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. नियमित साफसफाईचा अभाव, तीव्र दुर्गंधी, पाणीपुरवठ्यासाठी नळच गायब आणि तुंबलेल्या ड्रेनेजमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या स्थानकावरील स्वच्छतागृहात अनेक ठिकाणी नळच नसल्याने प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या घेऊन जावे लागत आहे. वापरानंतर रिकाम्या बाटल्या कमोडमध्ये किंवा परिसरात टाकल्या जात असल्याने ड्रेनेज व्यवस्था वारंवार तुंबत असून, अस्वच्छतेची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. परिणामी, संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
रोहा स्थानक हे मध्य रेल्वेचे अंतिम स्थानक असून, येथून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, अशा स्थानकावरील मूलभूत सुविधांची झालेली दुरवस्था रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
स्थानकाबाहेरील वाहनतळाची स्थितीही तितकीच बिकट आहे. पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून, वाहनचालकांना चिखलातच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि वाहनधारक दोघांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांनी स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई, गायब झालेल्या नळांची तातडीने बसवणूक, ड्रेनेज व्यवस्थेची दुरुस्ती आणि वाहनतळ चिखलमुक्त करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त प्रवाशांनी दिला आहे.
