गैरसोय होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात येणाऱ्या पर्यटकांकडून माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून स्वच्छता कर वसूल केला जातो. त्यातून त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेची जबाबदारी असते. मात्र, शहरातील इको पॉईंट या महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह अनेक वर्ष नादुरुस्त आहेत. दरम्यान पालिकेत प्रशासकीय राजवट असताना देखील सोयीसुविधा मिळत नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद स्वच्छता कर वसूल करते. स्वच्छता कराच्या माध्यमातून शहरात स्वच्छता ठेवणे आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने पालिकेवर टाकली आहे. प्रत्येक पर्यटकांकडून 50 रुपये स्वच्छता कर घेणाऱ्या पालिकेकडून पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधेसाठी स्वच्छतागृह देखील नीटनेटकी नसल्याचे चित्र आहे. शहरात प्रेक्षणीय स्थळे असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह बसवली आहेत. मात्र, बहुसंख्य ठिकाणी ही स्वच्छतागृह नादुरुस्त अवस्थेत असून विशेषत: महिला पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
माथेरान पालिकेत प्रशासक राजवट गेली अडीच वर्षापासून असूनदेखील पर्यटकांना सोयी सुविधा देण्यात पालिका कमी पडत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची गैरसोय होताना दिसत आहे. त्या सर्व स्वच्छतागृह यांच्याबद्दल माथेरान मनसेच्यावतीने आवाज उठवला जात असून पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय आहे.
माथेरान शहरात पर्यटनासाठी येणारा पर्यटक हा बहुसंख्येने इको पॉईंट या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतो. त्या ठिकाणी घोडा स्टँडच्या बाजूला पालिकेने दोन स्वच्छतागृह बसविले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वरूपात असलेल्या त्या सर्व स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत. स्वच्छतागृहाची आजची अवस्था मागील चार महिन्यापासून कायम आहे. स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याची साधी तसदी माथेरान नगरपरिषद घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, त्या ठिकाणी फायबर मटेरियलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. मात्र, स्वच्छतागृह बंद असल्याने त्या टाक्या पाण्याने भरून वाहत असतात.
पालिकेचे दुर्लक्ष
स्वच्छतागृहांचे दरवाजे दुरुस्त करण्यास पालिकेला वेळ नसल्याने माथेरानमधील इको पॉईंट येथे येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. त्याचवेळी तेथे व्यवसाय करणारे स्थानिक व्यावसायिक यांच्याकडून सातत्याने त्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याची मागणी देखील पालिका पूर्ण करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिका मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे हे कार्यालयाच्या बाहेर जाऊन आपल्या पालिकेच्या मालमत्ताची पाहणी करीत नसल्याने शहरात सर्वत्र गैरसोयीचे वातावरण आहे.