बाप्पा पावला! गणेशभक्तांचा टोल माफ झाला

कोकणात जाणार्‍यांना सवलत; पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध
। मुंबई । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा आणि मुंबई-बंगळुरु महामार्गावरुन जाणार्‍या वाहनांना ही सूट देण्यात आली आहे. शनिवार दि.27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत ही टोलमाफी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने टोल सवलतीचा निर्णय जाहीर केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरितादेखील ग्राह्य धरण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.

यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. तर 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. गणेश उत्सवानिमित्त गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्यासाठी खासगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. आता या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रे सादर केल्यावर त्यांना टोलमधून सूट मिळणार आहे.

गणेशभक्तांची थट्टा नको
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वारकर्‍यांसाठी मुख्यमंत्र्यांनी टोल माफ केल्याची घोषणा केली होती. मात्र टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी त्याबाबत कोणतेही परिपत्रक आले नसल्याचे सांगून वारकर्‍यांकडून टोलचे पैसे वसूल केले. मुंख्यमंत्र्यांची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे त्यावेळी दिसून आले. त्यामुळे आता खरोखरंच गणेशभक्तांचा टोल फ्री प्रवास होणार, की त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात सरकार पुन्हा अपयशी ठरणार, असा प्रश्‍न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तसेच वारकर्‍यांप्रमाणेच गणेशभक्तांची थट्टा नको, असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version