तळागडाचे बुरुज ढासळताहेत

किल्ला संवर्धनासाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या असून, तळगड किल्ला जतन करण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन या संघटनांकडून करण्यात आले आहे.

तळा शहराला लाभलेलं ऐतिहासिक वैभव म्हणून तळगड किल्ल्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तळगड किल्ल्याची तटबंदी व बुरुज ढासळत असून, किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायर्‍यांची देखील दुरवस्था झाली आहे. सदर तळगड किल्ला हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने किल्ल्या दुरूस्तीसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही संघटनांनी स्वखर्चाने किल्ल्यावर शिवमंदिर बांधणे, किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी ध्वज लावणे, तोफांना तोफगाडे बसविणे, किल्ल्याच्या प्रत्येक ठिकाणांवर फलक लावणे, किल्ल्यावर जाणार्‍या पायर्‍यांची दुरुस्ती करणे यासाठी तयारी दाखवली असता त्यालाही पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी शिवकार्य प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, युवा प्रेरणा प्रतिष्ठान, मी शिवभक्त प्रतिष्ठान, संस्कृती संवर्धन व पर्यटन सामाजिक संस्था, जय हरी सेवा मंडळ यांनी पुढाकार घेतला असून शहरात असलेल्या बारा वाड्यांतील ग्रामस्थांना निवेदनाद्वारे तळगड संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला बारा वाड्यातील ग्रामस्थांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून तळगड संवर्धनाच्या पाठपुराव्यासाठी लवकरच पुढील पाऊले उचलली जातील असेही या संघटनांच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

Exit mobile version