| पोलादपूर | प्रतिनिधी |
कोकणाची लाईफलाईन म्हणून मुंबई-गोवा महामार्ग ओळखला जात होता. सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मात्र पुर्वीच्या महामार्गालगतची शहरे गांवे यांना वगळून कोकणातून राजरोसपणे मार्गाक्रमण करीत असल्याने रोजगार, धंद्यांना हरताळ फासून कोकणाची लाईफलाईन सर्वसामान्यांसाठी जीवघेणी ठरत आहे.
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण असे दोन पर्याय अस्तित्वात होते. मात्र, प्रत्यक्षात हे दोन्हीही पर्याय एकामागून एक उपयोगात आणण्याचे ठरल्याने या महामार्गाच्या कामाला तांत्रिकदृष्टया विलंब झाल्याचे सकृतदर्शनी मत होऊ शकेल. मात्र, या कामातील भुसंपादनामध्ये झालेला प्रशासकीय आणि वनविभागाच्या परवानग्यांसाठीचा विलंब हा देखील तब्बल 12 वर्षे महामार्ग रखडण्यास कारणीभूत ठरला आहे.
या महामार्गालगतच्या अनेक गावांना टाळण्यासह रामवाडी, वडखळ, गडब, अगदी इंदापूरदेखील बायपास करण्यात आल्याने महामार्गावरून गायब झाले आहे. आश्चर्यकारकरित्या कोलाड वरसगांव हा रोहा शहराकडे जाणारा मार्ग अद्याप महामार्गालगत असल्याने येथील स्थानिकांना महामार्गालगत रोजगार धंदे व व्यवसायाची संधी प्राप्त होत आहे. इंदापूर ते माणगांव तालुक्यातील वडपाले गावापर्यंतचे 27 कि.मी.चे काम 47 टक्के पूर्ण झाले असून यामध्ये माणगाव शहर टाळून बायपास महामार्ग होणार आहे व लोणेरे हे महामार्गालगतचे गांव कसे असेल याचा सद्यस्थितीत अंदाज लागत नाही. वडपाले येथून पुढे महाड तालुक्यातील वीर रेल्वेस्टेशन सुरू होत असून या वडपाले पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द या 39 कि.मी. अंतराच्या चौपदरीकरणामध्ये दासगांव, वहूर, महाड, चांभारखिंड, शेडाव, नांगलवाडी फाटा, लोहारे ही गांवे महामार्गापासून दुरावली आहेत.
पोलादपूर शहरातील महामार्ग चक्क अंडरपास म्हणजे भुमिगत झाल्याने महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील शेवटचे शहर असलेल्या या गावातील रिक्षा व मिनिडोर तसेच खासगी लक्झरीतील प्रवासी वाहतूक, फुले व फळविक्रेते, व्यावसायिक आणि मद्यविक्रेते यांच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम होणार असून सद्यस्थितीत काहीजणांना भूसंपादनाचे मोबदले भरमसाठ अव्वाच्या सव्वा दराने मिळाल्याने नजिकच्या काळात धंदे व्यवस्थित चालले नसले तरी दूरगामी परिणामात कामाविना हात रिकामे राहण्याचीच शक्यता दिसून येत आहे. कशेडी घाटातील 9 कि.मी अंतर भोगाव खुर्दपर्यंतच्या महामार्गावर असून त्यापुढे मुंबईकडे आणि गोव्याकडे असे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. कशेडी घाट ते परशूराम घाट या 34 कि.मी. अंतराचे सुमारे 76 टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गावरून भरणा नाका आणि अन्य लोकवस्त्यांना महामार्गावरून गायब करण्यात आले आहे. शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये वाहनाचा वेग 80 ते 120 कि.मी. प्रतिताशी असा होत असल्याने लगतच्या गावांच्या अस्त्वित्व वाहने आणि प्रवाशांचे सपशेल दूर्लक्ष होत आहे.
पनवेल पळस्पा ते झाराप सिंधुदूर्ग या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरूवातीला 960 कोटी होती ती कालांतराने 1560 कोटी रूपयांपर्यंत वाढली. मात्र, आता संपूर्ण उपक्रमाचे बजेट 12 हजार 300 कोटी रूपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, 2010 पासून प्रत्यक्ष चौपदरीकरणाला सुरूवात झाल्यानंतर या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर आजमितीस तब्बल 2500 प्रवाशांचे प्राण जाऊन 7 ते 8 हजार प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या जखमा होऊन जीवनाचा संघर्ष करावा लागल्याने हा महामार्ग कोकणाचा लाईफलाईन न ठरता सर्वार्थाने कोकणाला मरणपंथाला नेणारा ठरत असल्याचे सद्यस्थितीत जाणवत आहे.