| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथे पारंपारिक कुंभार व्यवसायाला उतरती कळा लागली असून विविध समस्यांनी कुंभार समाजाचा व्यवसाय हा संकटात सापडला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा तांबड्या मातीचा वापर करून संक्रांतीसाठी सुगडं, विविध कार्यांसाठी मडकी, झाडांसाठी कुंड्या, दिवाळीकरीता पणत्या, पाण्याचे माठ व शेगडी तयार करणे हा असून श्रीवर्धन येथील कुंभार वाड्यातील दहा ते बारा कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे.
डोंगरावरून तांबडी माती आणीत ती माती चाळून त्यातील खडे वेगळे केले जातात आणि त्यानंतर माती पाण्यात भिजवून एकजीव केली जाते. भिजवलेली माती हाताने मळून एकजीव करण्यात येते, जेणेकरून मातीला योग्य आकार देता येतो, तयार केलेला मातीचा गोळा फिरत्या चाकाच्या मध्यभागी ठेवीत हातांच्या आणि बोटांच्या सहाय्याने फिरत्या चाकावर मातीला योग्य आकार दिला जातो. आकार दिलेले हे ओले सुगड चाकावरून वेगळे करीत सुकण्यासाठी ठेवले जाते.सुकलेल सुगड पक्के करण्यासाठी भट्टीत भाजण्यात येतात.
श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील तांबडीचा डोंगर असून डोंगरातील काही अंशी भाग हा कुंभार व्यावसायिकांसाठी राखीव आहे. येथील तांबडी माती ही ज्या व्यवसायिकांकडे कुंभार जातीचा दाखला आहे, त्या व्यवसायिकाला नगरपरिषदेकडून माती अल्पदरात देण्यात येते.तांबडीचा डोंगर परिसरात वाढती वस्ती या अनुषंगाने माती आणण्यासाठी व्यावसायिकाला मालवाहक वाहन नेणे अशक्य होऊ लागले. मनुष्यबळाची कमतरता या कारणास्तव हाती तांबडी माती आणणे हे व्यवसायाकरीता अपुरे पडत आहे.
तांबड्या मातीची समस्या, घरातील तरुणांनी नोकरी निमित्त शहराची धरलेली वाट त्यामुळे अपुरे मनुष्यबळ त्यातच मजुर घेतले तर अवास्तव मजुरी, श्रीवर्धन तालुक्यात दिवसेंदिवस कमालीची घट होत चाललेली भातशेती त्यामुळे भात तुसाची कमतरता यामुळे तुसाचे वाढते भाव त्यातच अवकाळी पाऊस या अनेक कारणांमुळे व्यवसायास उतरती कळा लागली आहे.






