अथक प्रयत्नांनंतर प्रोपिलीन गॅस टँकर हटवला; एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक सुरळीत
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेला अत्यंत ज्वलनशील प्रोपिलीन गॅस टँकर अखेर 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हटवण्यात आला. त्यामुळे पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुन्हा पूर्णपणे सुरळीत सुरू झाली आहे.
मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सुमारे 5 वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारा गॅस टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून प्रशासनाने तात्काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली आणि काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. या निर्णयामुळे महामार्गावर 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हजारो प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि रुग्ण वाहनांत अडकून पडले. अन्न, पाणी व स्वच्छतागृहाच्या सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
टँकरमध्ये गॅस शिल्लक असण्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य अत्यंत सावधगिरीने राबवण्यात आले. फायर ब्रिगेडकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस, एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, ओएनजीसीचे तज्ज्ञ, सीआयएसएफ जवान आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी टोलवसुली सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अखेर 32 तासांच्या प्रयत्नांनंतर टँकर हटवण्यात यश आले असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
