वाहतूक कोंडीची साडेसाती संपेना !

। माणगाव । वार्ताहर ।

होळी उत्सव संपून महिना लोटला तरीही मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर शहरातील बाजारपेठेतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होत नाही. त्यामुळे या शहराच्या दोनही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे इंदापूर व माणगाव मधील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या बाजारपेठेचा रस्ता कधी मोकळा श्‍वास घेणार असा मार्मिक सवाल नागरिक उपस्थित करीत असून होळी नंतरही माणगावातील वाहतूक कोंडीची साडेसाती संपता संपेना झाली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने प्रवासी नागरिकांचीही लगबग मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यातच शाळा विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्यानंतर गावी जाण्याची लगबग सुरु झाली त्यातच लग्नसराई सुरु झाल्याने नागरिकांनी गावाकडे कूच केली आहे. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली असून त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठेत दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत दिवसभर माणगावात वाहतूक कोंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. याचा फटका प्रवासी नागरिकांना चांगलाच बसला असून या वाहतूक कोंडीचे कोडे कधी सुटणार हा प्रश्‍न नागरिकांना भेडसावत आहे.

पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी रायगडात आले आहेत. दर शनिवार रविवार व हॉलीडे आला की, माणगाव बाजारपेठेत प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला आहे. माणगावचे दोन्ही बाजूंनी येणार्‍या जाणार्‍या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीशी सामना प्रवासी नागरिकांना करावा लागत आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने दरम्यानच्या काळात या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे पर्यटक नागरिकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे पाणीच पडले. कोकण व तळ कोकणात जाणार्‍या व येणार्‍या नागरिकांना या वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. दर शनिवारी-रविवारी माणगाव व इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या दोन्ही बाजारपेठेला बायपास काढण्याचे काम गेले अनेक वर्षापासून सुरु असून ते काम रखडले असल्याने नागरिकांना याचा नाहक फटका बसत आहे.

Exit mobile version