वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे

| पनवेल | वार्ताहर |
तळोजा एमआयडीसी येथून अंबरनाथ, डोंबिवलीकडे जाणार्‍या रोडवरील आयजीपीएल चौक ते नागझरी गाव यादरम्यानचे रस्त्यावरील खड्डे अखेर पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून बुजवले आहेत.

तळोजा एमआयडीसी येथून अंबरनाथ, डोंबिवली कडे जाणार्‍या रोडवरील आयजीपीएल चौक ते नागझरी गाव या दरम्यानचे रोड अत्यंत खराब असून, चार ते पाच ठिकाणी दीड ते दोन फूट खड्डे होते. ते खड्डे भरण्याबाबत वारंवार एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतु सदर रस्त्याबाबत स्थानिक शेतकरी व एमआयडीसी यांच्यात वाद असल्याने या रस्त्याचे काम खोळंबले होते. परंतु, गेले 8 ते 10 दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसाने पाणी साचल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली. दररोज सात ते आठ कर्मचारी दोनशे मीटरच्या अंतरावर उभे राहून रोड दुभाजकाचे काम करून वाहनचालकांना पुढे जाण्यास मार्गदर्शन करत असतात.

सतत पाण्यात उभे राहून कर्तव्य करत असल्यामुळे अनेक पोलिस कर्मचार्‍यांना पायाला चिखल्या पडण्याचे विकार निर्माण झाले आहेत. म्हणून वाहतूक शाखेच्या स्तरावर साधनसामुग्री उपलब्ध करून सदर पोलीस अंमलदारांनी तीन ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम केले. या कामामुळे दररोज आपला जीव मुठीत घेऊन जाणार्‍या वाहनचालकांनी समाधान मानून या वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

Exit mobile version