सत्तावीस वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर : फादर लुणीस

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सत्तावीस वर्षांपूर्वी रेव्ह. फादर रुडॉल्फ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली पतसंस्थेच्या रूपाने लावलेले छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे प्रतिपादन मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माऊंट कार्मेल चर्चचे धर्मगुरू फादर बोनाव्हेंचर लुणीस केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार, व्हाईस चेअरम फ्रान्सिस डिसोझा, सचिव सिमोन वेगस यांच्यासाहित संचालकीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी फादर बोनाव्हेंचर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सत्तावीस वर्षांपूवी एका छोट्याशा खोलीत सुरू झालेली पतसंस्था ही भव्यदिव्य इमारतीमध्ये आली आहे. ‘पैशावर विश्‍वास ठेवण्यापेक्षा विश्‍वासावर पैसा ठेवा’ हे ब्रीद वाक्य जोपासत कोर्लई पतसंस्थेने आपल्या विविध नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून एक सक्षम आर्थिक स्थैर्य दिले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कामगिरीचा उल्लेख केला आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेची वाटचाल ही गोरगरिबांना साथ देणारी राहील, अशी ग्वाही दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मार्सेलीन रुझार यांनी सांगितले की, कोलई ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेने आजपर्यंत 27 वर्षांची व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. आजमितीस संस्थेचे 2467 सभासद आहेत.संस्थेचे वसुली भागभांडवल हे 51लाख 7 हजार 475 एवढे असून, राखीव निधी 91.45 लाख इतके आहे. संस्थेच्या ठेवी 4 कोटी 35 लाख 73 हजार 431 आणि पैसे 34 आहेत तर 3 कोटी 3 लाख 67 हजार 155 इतके असून, त्यापैकी एक कोटी 39 लाख 87 हजार 893 इतके वसूल झाले आहे.

संस्था पाच कोटी ठेवींकडे वाटचाल करत आहे आणि यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. मार्च 2022 अखेर संस्थेला पाच लाख वीस हजार दोनशे आणि 47 पैसे नफा झाला आहे. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लगला आहे या सर्व सभासद ग्राहकांचे व सर्व कर्मचार्‍यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या 2022-23ते2026-27 या काळकरिता निवडून आलेले संचालक मंडळ यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन व्यवस्थापक लॉरेन्स वेगस यांनी, तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्हाईस चेअरम फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.

Exit mobile version