| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर येथील अक्कादेवी आदिवासी अंगणवाडीवर, 19 जुलै रोजी झालेल्या पावसात कोसळून पडलेले झाड बाजूला हटवून अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग खुला केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांनी यासाठी प्रयत्न केले. अंगणवाडीवर झाड कोसळून पडल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. अंगणवाडी सेविका दमयंती ठाकूर यांनी अंगणवाडीवर कोसळून पडलेल्या या झाडाची माहिती तर मूळपाडा येथील जगदीश ठाकुर यांच्या घराजवळ असणारा मार्ग पावसात खचून, उखडला होता. त्यामुळे या रहदारीच्या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. याही रस्त्याची घबाडी यांनी दुरुस्ती करून घेतली आहे. ही दोन्ही कामे घबाडी यांनी स्वखर्चाने करून घेतली आहेत.
चिरनेर गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला. यात अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. येथील काही घरांच्या भिंतींची पडझड आणि झाडे कोसळून पडली आहेत. तसेच गावातील काही अंतर्गत रस्ते उखडले आहेत. सध्या नुकसानीच्या पंचनामांचे काम सुरू आहे.