रायगड जिल्ह्यात फूड ट्रकचा ट्रेंड तरुणांसह लहानग्यांनाही भुरळ

। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
पाश्‍चिमात्य देशात रुजलेल्या फूड ट्रकची संकल्पना रायगड जिल्ह्यातदेखील रुजताना दिसत आहे. जिल्ह्यात उरण व अलिबाग येथील मांडवा येथे फूड ट्रक असल्याची माहिती इंटरनेटवर मिळते. मात्र, पालीसारख्या जेमतेम 15 हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातदेखील अनोखे व एकमेवाद्वितीय महाराष्ट्रातील एकमेव फिरते डबल डेकर फूड ट्रक साकारण्यात आले आहे. या फूड ट्रकला जिल्ह्यासह मुंबई व पुण्यातील ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरुणाईसह लहानग्यांनाही या फूड ट्रकने भुरळ घातली आहे.
कोरोनाचे सावट कमी झाल्यावर सुधागड तालुक्यातील राबगाव येथील संतोष राम भोईर या तरुणाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही फूड ट्रकची संकल्पना सत्यात उतरवली. हा डबल डेकर फूड ट्रक असून, याला नाव दिले आर.बी. फूड्स. संतोषने सांगितले की अशा प्रकारचा फूड ट्रक जिल्ह्यात कुठेही नाही. या आधी तो पालीमध्ये आईस्क्रीम पार्लर चालवीत होता. आईस्क्रीम पार्लरची संकल्पनासुद्धा सुधागड तालुक्यात त्यानेच पहिल्यांदा आणली. काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करावे यासाठी संतोषने फूड ट्रक चालू करण्याचे ठरविले. मग त्याने सेकंडहॅन्ड 407 टेम्पो खरेदी केला. त्याला टेक्निशियनद्वारे नवे रूप दिले. यासाठी 11 ते 12 लाख रुपये खर्च आला.
फूड ट्रकचे आकर्षक रंग, डिझाइन, किचनची रचना, वापरलेला पत्रा व साधनसामुग्री आदी सर्व कल्पना संतोष भोईर यांनी सुचविली. बहुतांश फूड ट्रॅकमध्ये फक्त किचन असते. म्हणजे, आतमध्ये खाद्यपदार्थ बनवून ते ग्राहकांना बाहेर दिले जातात. मात्र, संतोषने या पारंपरिक पद्धतीला फाटा देत ट्रकच्या आतमध्ये सुसज्ज किचन तर तयार केलेच; मात्र ट्रकच्या वरच्या बाजूला आकर्षक अशी बसण्यासाठी व्यवस्था केली जिथे पंधरा ते सोळा लोक छानपैकी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. विशेषतः सायंकाळी व रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या विद्युत रोषणामुळे ग्राहक येथे बसून खाणे पसंत करतात. तसेच अनेक जण सेल्फीदेखील घेतात. तरुणांना तर हा फूड ट्रक खूप आकर्षित करतो.

काय आहे फूड ट्रक
एका मोठ्या वाहनामध्ये अन्नपदार्थांची निर्मिती आणि विक्री करणार्‍या यंत्रणेला अन्न ट्रक व्यवसाय म्हणतात. या व्यापारांतर्गत कोणताही खाद्यपदार्थ बनवण्याचे साहित्य, सर्व सामान आणि स्वयंपाकी ट्रकच्या आत उपस्थित असतात. गेल्या काही वर्षांपासून फूड ट्रक व्यवसायाला खूप पसंती मिळत आहे. मात्र संतोष राम भोईर यांनी बनविलेल्या ट्रकमध्ये 15 ते 16 ग्राहकांना वर बसण्यासाठी आकर्षक जागा आहे. ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.

जिल्ह्यात ही अतिशय नवीन संकल्पना आहे. यामध्ये मी आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. त्यामुळे अनेकांना ही संकल्पना आवडली आहे. दर्जेदार खाद्यपदार्थ व चांगली सेवा पुरवितो. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे.

संतोष भोईर, फूड ट्रक, मालक

Exit mobile version