मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीमधील चिंचवाडी येथे वडाखालची शाळा या उपक्रमांतर्गत ठाकर आदिवासी कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सहा दिवसांच्या या ठाकर आदिवासी कला महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीविषयी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
‘वडाखालची शाळा’ संकल्पनेतून ठाकर आदिवासी वाडीत सहा दिवसांचा कला महोत्सव आयोजन पोशीर ग्रामपंचायतमधील चिंचवाडी येथे करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या संध्याकाळच्या शाळेच्या माध्यमातून वाडीतील मुलांच्या अंगभूत कला-गुणांना वाव देणे, त्यांची ओळख निर्माण करणे आणि आत्मविश्वास वाढवणे हे कार्य या संकल्पनेंतर्गत सातत्याने सुरू आहे. मेघा आणि यश (कॅम्पर शेफ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या भागात प्रथमच असा कला महोत्सव आयोजित करण्यात आला.
या कला महोत्सवात देवपाडा, उंबरवाडी, गिरेवाडी आणि वाघ्यावाडी येथील शाळांमधील मुलांनीही सहभाग घेतला. विविध कला, खेळ आणि सादरीकरण यामधून मुलांनी प्रचंड आनंद घेतला. वाडीतील मुलांनी आलेल्या पाहुण्यांचा आपुलकीने पाहुणचार केला. झाडांची माहिती, मातीच्या घरांची रचना, ढेंगच्या खेळाची कमाल अशा अनेक बाबी मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन पाहुण्यांना समजावून सांगितल्या. या कला महोत्सवामागील संकल्पना होती; प्रत्येकाने एकमेकांकडून शिकावे आणि शिकण्यासाठी वयाची कोणतीही अट नव्हती.
वडाखालची शाळा या ठाकर आदिवासी कला महोत्सवाला बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांपेक्षा वाडीतल्या स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदिवासी मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या विविध कलावस्तू, नैसर्गिक रंग व स्थानिक साहित्याचा वापर करून संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजवला होता. ‘वडाखालची शाळा’ या संकल्पनेनुसार शिक्षण, कला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या महोत्सवात पाहायला मिळाला. चिंचवाडी मधील कार्यकर्ते मनोहर पारधी आणि नारायण पारधी यांनी पखवाज आणि हार्मोनियम वादन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
मुलांना विविध कला शिकवण्यासाठी देशाच्या विविध भागांतून कलाकार आणि मार्गदर्शक उपस्थित होते. रॉक बॅलन्सिंग कलेसाठी प्रसिद्ध असलेले गौतम वैष्णव यांनी दगड संतुलन कलेचा अनुभव दिला.11 वर्षांचा वृक्ष याने इलेक्ट्रिक गिटार आणि पियानो वाजवून दाखवत थ्री डी चित्रकलेबाबत मार्गदर्शन केले. सिद्धी यांनी मुलांसाठी मातीची घडण (क्ले मॉडेलिंग) कार्यशाळा घेतली. पुण्याहून आलेले 72 वर्षीय नंदकुमार पिसाळ यांनी चित्रकला व हस्तकलेचे धडे दिले. हरेश पैठणकर यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण दिले, तर दीपक मलानी यांनी खेळाच्या माध्यमातून थेरपी कशी करता येते हे प्रत्यक्ष सादर करून दाखवले. उत्तराखंडहून आलेल्या ‘झिंदगी मुबारक’ समूहाने मुलांना युकुलेली वादनाचे प्रशिक्षण दिले.
कलेला मिळाले व्यासपीठ
आदिवासी मुलांमध्ये कला असतेच, फक्त त्या कलेला योग्य साथ आणि व्यासपीठ मिळण्याची गरज असते. ‘वडाखालची शाळा' ही केवळ शाळा नसून, ती एक परिवर्तनाची संकल्पना आहे. कलेच्या, निसर्गाच्या आणि सहभागात्मक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिकण्याची ओढ निर्माण होते. समाजाने अशा संकल्पनांना पाठबळ दिल्यास ग्रामीण व आदिवासी मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते.
