स्वातंत्र्यदिनी शाळेत ‌‘तिरंगा‌’ फडकवलाच नाही

विद्यार्थी संख्या शून्य झाल्याने शाळा बंद

| पाली | प्रतिनिधी |

एकेकाळी ज्ञानदानाचे पवित्र मंदिर असलेली आणि शेकडो उच्चशिक्षित नागरिक घडवणारी 10 दशके (100 वर्षे) जुणी रायगड जिल्हा परिषद शाळा भेरव यंदा एका वेगळ्याच दुर्दैवी कारणाने चर्चेत आली आहे. 80 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत असताना, या ऐतिहासिक शाळेत मात्र, यावर्षी देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवलाच गेला नाही! प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक, माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

जिल्हा परिषद शाळा केवळ एक इमारत नसून परिसराची अस्मिता होती. गेल्या 100 वर्षांत या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडून दिली. एकेकाळी या शाळेला ‘केंद्र शाळा’ म्हणून दर्जा मिळालेला होता. या शाळेतून शिकून बाहेर पडलेले अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत, तर काहींनी परदेशातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या शाळेच्या भिंतींशी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी आणि भावना घट्ट जोडलेल्या आहेत.

काळाच्या ओघात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पीक आले आणि दुर्दैवाने या ऐतिहासिक सरकारी शाळेची विद्यार्थी संख्या घसरत गेली. यंदा पटसंख्या ‘शून्य’ झाल्यामुळे प्रशासकीय नियमांनुसार ही शाळा बंद पडली. वर्गखोल्या शांत झाल्या, मुलांचा किलबिलाट थांबला; पण शाळेचा इतिहास आणि तिचे अस्तित्व गावकऱ्यांच्या मनात कायम होते. शाळा बंद असली, तरी 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असल्याने आणि इमारत शासकीय असल्यामुळे तिथे ध्वजारोहण होणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या 80व्या स्वातंत्र्यदिनी शाळेच्या आवारात तिरंगा फडकवलाच गेला नाही. शाळा बंद असली तरी ती शासकीय मालमत्ता आहे. अशा ठिकाणी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रप्रमुख, गट शिक्षण अधिकारी किंवा स्थानिक ग्रामपंचायतीची होती.

Exit mobile version