अन्यायाविरोधात आवाज उठविणं पडलं महागात
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील ट्रॉपिकाना हॉटेलमध्ये विजेच्या धक्क्याने प्रणय जरांडे या 22 वर्षीय तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला होता. हॉटेल व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे प्रणयचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करतानाच ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनासह पोलिसांविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुशेत येथील ट्रॉपिकाना हॉटेलमध्ये स्विमींग पूलची साफ सफाई करणाऱ्या कामगाराला सोमवारी सकाळी बिघाड झालेल्या विजेची दुरुस्ती करण्यास सुपरवायझरने सांगितले. मात्र सुरक्षा उपलब्ध करून देण्यास हॉटेल व्यवस्थापन उदासीन ठरल्याने विजेचा धक्का लागून कामगार जागीच मृत पावला. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने जरांडे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी हॉटेलमध्ये धाव घेतली. प्रणयला न्याय देण्यासाठी सकाळपासून हॉटेलसमोर ग्रामस्थ जमले. परंतु पोलिसांच्या आडोशाला बसलेल्या हॉटेल व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सायंकाळी येऊन शेकाप स्टाईलने धारेवर धरत हॉटेलमधील व्यवस्थापक कृपाल निगी यांना ग्रामस्थांसमोर हजर राहण्यास भाग पाडले. दोन कोटी रुपयांची भरपाई, 50 हजार रुपये पेन्शन व वैद्यकिय सेवा पुरविण्याची मागणी यावेळी निगी यांच्याकडे केली होती. ही मागणी दोन दिवसात पूर्ण करण्याचे कृपाल निगी यांनी आश्वासन दिले होते.
या घटनेला सात दिवस होत आले आहेत. तरीदेखील व्यवस्थापनाने कोणतीही भुमिका घेतली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. उलट पोलीसांची मदत घेत हॉटेल व्यवस्थापनाने ग्रामस्थांवर जमाव केल्याचा व नुकसान केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे व्यवस्थापनासह पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ट्रॉपिकाना हॉटेल व्यवस्थापनाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.