झोपडीत घुसला ट्रक; कर्जत चाहुची वाडी येथील घटना

| नेरळ । वार्ताहर ।
नाशिक येथून कर्जतमार्गे जेएनपीटीकडे मार्गक्रमण करीत असलेल्या सिमेंट पिशव्यांनी भरलेला ट्रक 23 मार्च रोजी दुपारी कर्जत चाहुची वाडी येथील चहाचे दुकान असलेल्या झोपडीमध्ये घुसला. या अपघातात त्या झोपडीमधील चहाच्या दुकानाचे आणि मोटार सायकलचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल येथे उपचार सुरू आहेत.

रवींद्र सखाराम बुंदेला हे ट्रक चालक आपल्या ताब्यातील ट्रक नाशिक एमआयडीसी मधून सिमेंटच्या गोणी घेऊन जेएनपीटी बंदराकडे घेवून निघाला होता. एम एच 14 एच बी 0412 हा ट्रक नाशिक येथून शहापूर मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग 548अ वरून 23मार्च रोजी प्रवास करीत होता. पुढे हा ट्रक दुपारी तीनच्या सुमारास तालुका हद्दीत आला. तालुका हद्दीत प्रवेश केल्यावर चाहूची वाडी येथे कर्जतकडे जाताना तीव्र उतार असून त्याबाबत माहिती देणारे फलक राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून लावण्यात आले आहेत. मात्र त्याबाबत विचार न करता रस्त्याची तीव्र उताराची परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून मालाने भरलेला लोडेड ट्रक त्याचा चालक बुंदेला याने बेदरकारपणें चालविला आणि घाटातील रस्ता उतरत असताना ट्रक कलंडला.

त्यावेळी हा ट्रक चाहुची वाडी येथील आदिवासी ग्रामस्थ वालकू धर्मा ढोले यांच्या झोपडीमध्ये घुसला. त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि वालकू हे दोघे येथे होते.मात्र रस्त्यावर काहीतरी आदळण्याचा आवाज येत असल्याने झोपडी बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ट्रक झोपडीवर आल्यावर सिलेंडर वर आढळला असता तर मोठा स्फोट झाला असता आणि जीवित हानी झाली असती.मात्र या अपघातात ट्रक चालक रवींद्र बुंदेला आणि ट्रकचे क्लिनर संतोष देवराम बुरडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.त्या दोघांना कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजी एम रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक किसवे हे करीत आहेत.

Exit mobile version