| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास काही संपता संपत नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 14 वार्षांपासून रखडलेले आहे. कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून पाहिला जाणाऱ्या या रस्त्याचे काम बहूतांशी पूर्ण झाले असले तरी महामार्गावरील उड्डाणपुलांची कामे अपूर्ण तर बायपासची कामे पुर्णपणे ठप्प आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल याची प्रतिक्षा नागरिकांना आहे.
त्यातच मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम नागोठणे हायवे नाका परिसरात सध्या जोरात सुरू आहे. हायवे नाका व रेल्वे स्थानक समोरील महामार्गावर उड्डाण पुलाच्या भरावाचे कामही सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर वाहतूक वाढली आहे. असे असतांनाच हायवे नाका येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल कल्पतरू समोरील सर्व्हिस रोडवर निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे रस्ता खचल्याने त्या ठिकाणी एक अवजड वाहतूक करणारा ट्रक अडकून राहिल्याची घटना शनिवारी (दि.31) रात्री घडली आहे. तद्नंतर रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी या खचलेल्या रस्त्यामधून ट्रकला बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर रस्ता खचलेल्या ठिकाणी थातूर मातुर पद्धतीने मलमपट्टी करण्यात आली आहे.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने कोकणात फिरायला जाणाऱ्या गाड्यांची मुंबई गोवा महामार्गावर महाड बाजूकडे मोठी वर्दळ होती. या गाड्यांना अडकलेल्या ट्रकमुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे महाड बाजूकडे जाणाऱ्या गाड्यांची या सर्व्हिस रोडवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान हा ट्रक जर कल्पतरू हॉटेलच्या बाजूला कलंडला असता तर मोठा अनर्थ घडला असता असे बोलले जात आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांनी तसेच साईट इंजिनिअर व सुपरवायझर यांनी मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कोणतीही कामे करतांना ती चांगल्या दर्जाची करावी आणि भविष्यातील अपघात टाळावेत अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे.






