खा.तटकरेंची पोलखोल; भाजप पदाधिकाऱ्यांनीच दिली तंबी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे ताठ मानेनं सांगतात कि, आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र लवकरच जलसंपदा मंत्री असताना केलेल्या घोटाळ्याबाबतचे सत्य पुराव्यासहित जनतेसमोर आणणार आहे, असं सांगत भाजपचे अल्पसंख्यांक प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी तटकरेंची पोलखोल केली.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नविन काहीतरी करता येईल, असे वाटले होते. मात्र भाजपसोबत तटकरेंनी हातमिळवणी केल्यानंतर पुन्हा त्रास सुरु झाला. याबाबत विरोध केल्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव केला जातो. त्यामुळे बाप-लेकाच्या जाचामुळे भाजपच्या सचिव पदाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे दिला असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

तटकरे पिता-पुत्राने कायमच जनतेला अमिष दाखवून त्यांच्या फसवणूक केली आहे. गोड बोलून काटा काढण्याची त्यांची खासियत आहे. लोकांना त्रास देणं हे त्यांचे काम आहे. त्याबाबतही पुरावे लवकरच सादर करणार आहे. तटकरेंना भाजपने जवळ केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल दहशत आहे. भाजपविरोधात बोलणार नाही, कोणत्या पक्षात जाणार याबाबत भविष्यात ठरवू. मतदार म्हणून काम करु, असेही सय्यद यांनी सांगितले.

येत्या काळात तटकरेंनी केलेल्या घोटाळ्याची केस पुन्हा उघडण्यासाठी प्रयत्न करणार. मात्र सरकारी कामात अनेक अडचणी येत असून चार ते पाच सहकाऱ्यांच्या मदतीने हा विषय तडीला नेणार आहे. कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असून आता मागे हटणार नाही, ही भूमिका असेल. संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याबाबत नाराजी आहे. भविष्यात भाजपने त्यांना पाठिंबा दिल्यास कोणताही कार्यकर्ता भाजपसोबत राहणार नाही. तटकरेंसाठी खूप केलं. मात्र त्यांना त्याची जाणीव नाही.

बबलू सय्यद, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव, भाजप
Exit mobile version