सोशल मिडीयामध्ये एकमेकांची स्पर्धा
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अलिबागपासून महाडमध्ये शिंदेगटात रस्सीखेच सुरु झाली आहे. आमदार दळवी यांच्या पत्नीसह राजा केणी आणि रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले यांचे नाव घेतले जात आहे. अध्यक्ष पदावरून होणाऱ्या अंतर्गत कलहाचे वादळ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
रायगड जिल्हयात महायुुतीमधील शिंदे गट विरुध्द अजित पवार गट यांच्यामध्ये पालकमंत्री पदासह विकासकामांच्या श्रेयवादावरून कलगीतुरा जगजाहिर आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले गेल्या पाच वर्षापासून पालकमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत, परंतु त्यांचे ते स्वप्न पुर्ण होत नाही, असे चित्र असताना दळवी विरुध्द तटकरे वाद आता विकोपाला गेला आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांची उणीधुणी काढण्यामध्ये मग्न आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अपघाताचे सत्र वाढत आहे. मात्र जिल्हयातील अलिबाग, रोहा, साळाव, तळेखार, अलिबाग, पेण मार्गावरील खड्डयांवर बोलण्यास त्यांना वेळच नाही, असे चित्र आहे. जिल्हा परिषद अखत्यारित येणारे पाच हजार किलो मीटरचे रस्ते खड्डेमय आहेत. गावे, वाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. महामार्गावरील रस्त्यांची देखील तीच अवस्था आहे. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून सध्या शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे गटातील आमदार दळवी यांचे समर्थकांनी सोशल मिडीयावर मानसी दळवी यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले आहे. सोशल मिडीयावर जाहीरातबाजी देखील त्यांच्या समर्थकांनी सुरु केली आहे. दुसऱ्या बाजूला दळवी यांचे जवळचे राजा केणी यांच्या समर्थकांकडून राजा केणी यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक देखील विकास गोगावले यांचे नाव अध्यक्ष पदासाठी घेत आहेत. महाडमध्ये विकास गोगावले यांनी स्वतःला आधीच अध्यक्ष घोषित केले आहे. दिलीप भोईर यांना प्रवेशावेळी अध्यक्ष पदाचे वचन दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.






