कारखान्यातील माती रस्त्यावर; धुळीमुळे अपघाताचा धोका
| पाताळगंगा | वार्ताहर |
सावरोली खारपाडा या रस्त्यांचे काम काही वर्षांपूर्वी झाल्याने वाहनचालकांच्या शारीरिक व्याधी कमी झाली आहे. मात्र, इसांबे या मार्गावर रस्त्यालगत निर्माण होत असलेले कारखाने मात्र या रस्त्याला केराची टोपली दाखवत आहे. या कारखान्याला भरावासाठी अथवा माती वाहून नेण्यासाठी अवजड वाहनांचा वापर केला जात आहे. यामुळे वाजवीपेक्षा जास्त माती यामध्ये लोड केल्यामुळे या ठिकाणी पडलेली पहावयास मिळत आहे. नोव्हेंबर महिना हिटचा असल्यामुळे या मातीचे धुळीत रुपांतर होऊन रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, माजगाव येथील वसंत पाटील या व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
इसांबे गावानजीक कारखाना निर्माण होत असून, मागील वर्षापासून त्याचे काम सुरु आहे. मात्र, येथील स्थानिक कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नसल्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी काम सुरु आहे. रस्त्यावर वाहनातून पडलेली माती पाणी मारुन साफ करण्याचे सहकार्य करीत नसल्यामुळे गुरुवारी वसंत पाटील यांचा या ठिकाणी अपघात झाला. तसेच दोन महिन्यांपूर्वी कोपरी येथील युवकाचा अपघात झाला. असे अनेक अपघात या ठिकाणी सातत्याने घडत असल्यामुळे व्यवस्थापक याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील वाहनचालक करीत आहेत.
या रस्त्यालगत येत असलेले कारखाने स्थानिकांना जरी नोकरी मिळणार असले तरीसुद्धा या मार्गावर प्रवास करणारे यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, व्यवस्थापक याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, हा रस्ता प्रवासीवर्गासाठी धोकादायक बनला आहे. मात्र, या रस्त्यावर असाच प्रकार सातत्याने घडत राहिले तर परिणामी आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, अशी प्रतिक्रिया या मार्गावरुन नित्यनेमाने प्रवास करणारे प्रवासी व्यक्त करीत आहेत.