। मुंबई । प्रतिनिधी ।
महायुती मोठे बहुमत मिळवून सत्तेवर आली. मात्र, मंत्रिपदावरून धुसफूस सुरूच आहे. हायप्रोफाईल मंत्रिपदे आपल्याला मिळावीत यासाठी भारतीय जनता पक्षासह शिंदे गट आणि अजित पवार गटात ‘दम लगाके हयशा’ सुरू आहे. सर्वाधिक जागा मिळवणारी भाजपा शिंदे आणि दादा गटाला क्रीम खाती देण्यास तयार नाहीत. किंबहुना शिंदेंकडील क्रीम खाती स्वतःकडे खेचू पाहत आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट आपली खाती सोडण्यास तयार नसल्याने अखेर दिल्ली गाठण्याची वेळ महायुतीवर आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गडबड सुरू असून 14 डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या दिशेने हालचालीही सुरू झाल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ठाणे येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समारे येत आहे. भाजपाश्रेष्ठी काही महत्त्वाची मंत्रिपदे शिंदे गटाला देण्यास तयार नाही, हा संदेश घेऊन बावनकुळे शिंदे यांच्याकडे गेल्याची माहिती मिळत आहे.