मारुती शिंदेंची भूमापक अधिकार्याविरोधात तक्रार
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस शेतकर्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून जागा हडप करण्याचे प्रकार समोर येत आहेत. परंतु एखाद्या शेतकर्याची मूळ मोजणी झाली असताना देखील त्या शेतकर्याची जागा अतिक्रमण करून त्याला मोजणीद्वारे साथ देणार्या शासनाच्या अधिकार्यांचा नवीन कारनामा समोर आला आहे. जमीन मोजणीच्या कायम हद्द समक्ष न दाखवता जागा हडप करण्याच्या उद्देशाने पंचनाम्यावर सह्या मागणारा भूमापक अधिकारी सुहास ढवण या अधिकार्याच्या विरोधात पेण तालुक्यातील कुरनाड येथील मारुती शिंदे या शेतकर्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
मारुती शिंदे या शेतकर्याची पेण तालुक्यातील कुरनाड येथे सर्व्हे क्र. 41 क्षेत्र 1-06-0 हे. आर इतके क्षेत्रफळ असणारी मिळकत त्यांच्या मालकीची असून, सदर जमिनीची गेल्या वर्षी भूमापक एस.पी. कुटे यांनी दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजी सरकारी मोजणी कायदेशीर पद्धतीने केली होती. त्यावेळी सर्व शेतकरी हजर होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकर्यांनी सह्या केलेल्या आहेत, असा मूळ नकाशा उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून मारुती शिंदे यांना मिळालेला आहे. मारुती शिंदे यांच्या शेतीला लागूनच गट नं. 40 क्षेत्र 0-69-0 हे. आर. इतके क्षेत्रफळ असणारी मिळकत नारायण गुणाजी पवार या व्यक्तीने विकत घेतली असून, या व्यक्तीने मारुती शिंदे यांच्या गट नं. 41 मधील काही जमीन अतिक्रमण करून हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच या व्यक्तीला भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक सुहास ढवण हा अधिकारीदेखील मदत करत असल्याचा आरोप मारुती शिंदे यांनी केला आहे.
मारुती शिंदे व त्याच्या लगतच्या शेतकर्यांना मोजणीसाठी सकाळी 11 वा. चा वेळ दिला असताना भूमापक सुहास ढवण हा अधिकारी व गुणाजी पवार हा शेतकरी सकाळी 10 वाजताच हजर राहून मोजणीच्या खुणा संबंधित शेतकर्यांना न दाखवताच मारुती शिंदे व लगतचे शेतकरी सुधीर पाटील, चंद्रकांत आयरे, भास्कर आयरे यांच्या समक्ष पंचनामा न करताच सह्या घेण्याचा प्रयत्न केला असता मारुती शिंदे यांनी सह्या देण्यास विरोध दर्शविला. लगतचे शेतकरी हजर नसताना मूळ मोजणीच्या हद्द कायम असतानाही त्यामध्ये हेराफेरी करून जागा हडप करण्याचा डाव मारुती शिंदे यांनी हाणून पाडला तसेच पेण येथील भूमी अभिलेख अधिकारी यांना देखील यासंबंधी तक्रार केली असता त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने मारुती शिंदे यांनी अखेरीस भूमी अभिलेख उपअधिक्षक यांना आपल्याला न्याय मिळावा याकरिता तक्रारी अर्ज दिला आहे. मला जलद न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषणास बसणार असल्याचेदेखील शिंदे म्हणाले.