| उरण | वार्ताहर |
आपली छोटीसी चूक आपल्या जीवावर बेतू शकते यासाठी आईवडिलांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशीच दुर्दैवी घटना उरणमध्ये नव्याने उभी राहिलेल्या द्रोणागिरी नोडमधील स्काय व्हीला या हायफाय सोसायटीमध्ये रविवारी घडून तीन वर्षीय बाळाचा 12 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, घटना घडूनही बाळाच्या आईवडिलांना कळले नाही. तेथील वॉचमन व रहिवाशांनी येऊन घटनेची माहिती त्यांना दिली. द्रोणागिरी नोडमधील अनेक इमारतींना परवाना नसताना बिल्डरांनी नियमांचे उल्लंघन करून वापर सुरू केला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचीही प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सिडकोच्या माध्यमातून उरणजवळच द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये हायफाय सोसायटी व मोठमोठे टॉवरचे जाळे उभारले जात आहे. अशाच स्काय व्हिला या हायफाय सोसायटीत हा प्रकार घडला आहे. रविवारी या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून शिवांश चव्हाण या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांशचे आईवडील या घरात राहण्यासाठी सामान शिफ्ट करत होते. ते दोघेही कामात व्यस्त असताना चिमुकला शिवांश बाल्कनीमध्ये खेळत होता. खेळत असताना 12 व्या मजल्यावरून पडल्याने शिवांशचा जागीच मृत्यू झाला. मुलाला पाहून आईवडिलांना जबर धक्का बसला. त्यांनी तात्काळ शिवांशला रुग्णालयात नेले. परंतु त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयातच शिवांशच्या आईने टाहो फोडला. या घटनेमुळे द्रोणागिरी नोड परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.