मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही उरण-पनवेल मार्ग अजूनही खड्डयातच

| उरण | वार्ताहर |
खड्डे भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिल्यानंतर भर पावसात त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून उरण-पनवेल मार्गावरील खड्डे मात्र कायम आहेत. दुसरीकडे मागील तीन दिवसांपासून उरण परिसरात पावसाने उसंत घेतली असतानाही रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकरणाकडे सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावरील प्रवासी व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उरण-पनवेल मार्गावरील खड्डयामुळे नागरिकांना माण व पाठदुखीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

उरण-पनवेल मार्गावरील उरण शहर ते नवघर फाटा असा सहा किलोमीटरचे अंतर असलेल्या या मार्गावर बोकडविरा गाव, वायु विद्युत केंद्र कामगार वसाहत, फुंडे स्थानक, सिडको कार्यालय, नवघर उड्डाण पूल, सिडकोच्या सेक्टर 12 जवळील मार्ग तसेच जेएनपीटी कामगार वसाहत व नवघर फाटा अशा तीन किलोमीटर अंतरावर भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे न बुजविल्याने पावसामुळे या खड्डयाचा आकारही वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावल्याने कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होऊ अनेकदा उन्हही पडत असल्यानेही रस्ता दुरूस्तीचे काम हाती का घेतले जात नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना प्रतिसाद मिळाला नाही.

Exit mobile version