उरणकरांची गटारी पाण्यात

पोलिसांच्या धसक्याने घराबाहेर पडणे टाळले

| उरण | वार्ताहर |

पैसे दुप्पट करण्याच्या नादात सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांच्याकडे उरणमधील अनेक लोकांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यामुळे एजंट लोकांना जाब विचारण्यासाठी कोप्रोली याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी बैठकीचे आयोजन रविवारी (दि.16) केले होते. मात्र, पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून याठिकाणी जमावबंदीचे आदेश जारी करुन या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. एकंदरीत, आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांनी पोलिसांच्या भीतीपोटी मटण व चिकन दुकानांकडे गटारी सणाच्या दिवशी जाणेच टाळले. त्यामुळे कोप्रोली येथील एका मटणाच्या दुकानातील तुकड्यांवर कुत्रा ताव मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.


गटारी सण हा यावर्षी रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्याने हा सण उरण शहर आणि ग्रामीण भागातील काही गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गटारी सणानिमित्त अनेक बकऱ्यांची, कोंबड्यांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे हा सण उरण शहर, चाणजे, नवघर, जासई, चिरनेर या ठिकाणी तिखटबार ठरला आहे. मात्र, उरण पूर्व विभागातील कोप्रोली, पिरकोण, सारडे, पाले, वशेणी, आवरे, गोवठणे, पाणदिवेसह इतर गावागावांतील गोरगरीब लोकांचे लाखो रुपये हे दुप्पटच्या नादात पिरकोण गावातील सतीश गावंड, कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील यांच्याकडे अडकून पडले आहेत. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात सतीश गावंड व सुप्रिया पाटील या व्यक्तींविरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version