| माणगाव | प्रतिनिधी |
ज्या मातीतून जन्म घेऊन एका तरुणाने हसत-हसत मृत्यूला कवटाळले, ज्या छातीवर राष्ट्रध्वजाचा अभिमान घेऊन तो रणांगणात झुंजला,त्या वीर यशवंतराव घाडगे यांचे शौर्य आजही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात स्फुल्लिंग चेतवणारे आहे. मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च शौर्यपदकाने सन्मानित झालेल्या या अमर वीराचा पराक्रम आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे, असे भावूक उद्गार कर्नल किशोर मोरे यांनी माणगाव येथे शुक्रवार, दि.9 जानेवारी रोजी आयोजित जयंती कार्यक्रमात काढले.
या कार्यक्रमास माणगाव तहसीलदार विपीन लोकरे, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, माजी सैनिक संघटना माणगाव-तळा तालुका अध्यक्ष सुरेश गायकवाड, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सभासद आदी मान्यवरांसह नागरिक, महसूल खात्याचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या समारंभास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
अतिशय तरुण वयात,मृत्यू समोर उभा असताना देखील,देशप्रेमाने भारलेल्या मनाने यशवंतराव घाडगे रणांगणात झेपावले. “माझ्या देशासाठी प्राणही कमीच आहेत” हे त्यांनी शब्दांत नव्हे, तर रक्ताने लिहून दाखवले. या पवित्र मातीतून भविष्यात असेच अनेक शूर जवान जन्माला येतील, असा विश्वास कर्नल मोरे यांनी व्यक्त केला. मात्र, ज्यांच्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत, त्यांच्या स्मरणासाठी आयोजित कार्यक्रमालाच मंत्र्यांनी पाठ फिरवावी, ही बाब उपस्थितांच्या मनाला खोल जखम देणारी ठरली.
हा कार्यक्रम भव्य असायला हवा होता गर्व आणि अभिमानाने भरलेला असायला हवा होता, पण शासनाच्या अनास्थेमुळे आणि पुरेशा निधीअभावी तो साधेपणातच आटोपता आला. ज्यांच्या पराक्रमाची दखल परदेशाने घेतली, ज्यांचे स्मारक परदेशी भूमीवर सन्मानाने उभे आहे, त्या वीराच्या स्मृतीकडे स्वतःच्या देशात मात्र दुर्लक्ष होत असल्याची वेदना अनेकांच्या डोळ्यातून दिसत होती. काळ असा होता की, या अमर वीराच्या पुतळ्यावर पक्ष्यांची विष्ठा पडत होती पुतळा विद्रूप होत होता तेव्हा कुठे स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या प्रयत्नातून त्यावर लोखंडी छत्री उभी राहिली. आजही त्यांच्या पराक्रमाचा धडा मराठी पाठ्यपुस्तकात नाही, संग्रहालय नाही, जयंतीसाठी पुरेसा निधी नाही. सैनिक भरती बंद आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक आणि सैनिक विश्रांतीगृहांची अवस्था विदारक झाली आहे. वर्षानुवर्षे अनास्थेची हीच परंपरा चालू आहे.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून स्मारक परिसरात सभामंडप उभारून थोडेसे सुशोभीकरण करण्यात आले, हे दिलासादायक असले तरी अपुरे आहे. ज्या वीराने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याच्या स्मृतीसाठी आपल्याकडे वेळ, निधी आणि संवेदना नाहीत का? असा सवाल या जयंतीदिनी पुन्हा एकदा उपस्थित झाला. किमान पुढील वर्षी तरी, वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती त्यांच्या शौर्याला, बलिदानाला आणि राष्ट्रप्रेमाला साजेशीडोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणणारीभव्य स्वरूपात साजरी होईल, अशी आशा प्रत्येक देशप्रेमी नागरिक व्यक्त करत आहे.







