वेखंडे कुटुंब रमले शेतीत; विविध प्रकारच्या भाज्यांचे विक्रमी उत्पादन

कर्जतच्या बाजारात ताज्या भाजीला मागणी

| नेरळ | संतोष पेरणे |

कर्जत तालुक्यात खरीप आणि रग्बी हंगामात भाताचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून कर्जत तालुक्यातील वदप येथील शेतकरी विनय मारुती वेखंडे यांची ओळख आहे. सध्या त्यांच्या कुटुंबाकडून भाजीपाला आणि पालेभाज्यांची शेती केली जात आहे. कर्जतजवळ असलेल्या वदप यांच्या बागेत सर्व प्रकारचा भाजीपाला आणि भाज्यांची शेती केली आहे. दरम्यान, वेखंडे सांचे संपूर्ण कुटुंब शेतीत रमले असून, कर्जत शहरातील हॉटेल्समध्ये त्यांच्या शेतातील ताजा भाजीपाला जात आहेत.


वदप येथील शेतकरी विनय मारुती वेखंडे यांना जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. शेतकरी म्हणून वडिलांपासून हातात घेतलेली शेती आजही परिस्थितीवर मात करून वेखंडे कुटुंब करीत आहेत. हिवाळा आणि उन्हाळ्यात राजनाला कालव्याचे पाणी घेऊन भाताची शेती तसेच भाजीपाला आणि भाज्यांची शेती अशी दुहेरी भूमिका वेखंडे यांच्याकडून केली जात आहे. गेली 13 वर्षे पावसाळा संपला की भाजीपाला शेतीत रमणारे वेखंडे कुटुंबामध्ये दोन तरुण उच्च शिक्षित असून, त्यांचे पदव्युतर शिक्षण झाले तरी तेदेखील आपल्या आई वडिलांना शेतीत मदत करतात.



यावर्षी वेखंडे यांच्या मळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या पाहायला मिळत आहेत. दीड एकर क्षेत्रात भाज्या, अर्ध्या एकरात पालेभाज्या, पाच एकरात कडधान्य आणि सात एकरात भाताची शेती असे काम वेखंडे कुटुंब आपल्या शेतात करीत असते. मात्र त्यांच्या शेतीचे महत्त्व म्हणजे सेंद्रिय खतांचा जास्तीत वापर हा आहे. पावसाळा संपला की ट्रॅक्टरने जमिनीची उखळण केल्यानंतर त्या जमिनीत शेणखत तसेच जीवामृत हे सेंद्रिय लिक्विड यांची फवारणी केल्यावर शेतीचे काम प्रत्यक्ष नोव्हेंबर महिन्यात सुरु केले आहे.

कोथिंबीर, मेथी, पालक, मुळा, गाजर या पालेभाज्या आणि टोमॅटो, वांगे, मिरची, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, शेवगा, शिराळे या भाज्यांची शेती केली आहे. त्याचवेळी महत्वाचे म्हणजे कर्जत तालुक्यात फारसे कोणी उत्पादन घेत फरसबी आणि हिरवा मटार यांची शेती केली आहे. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात नगर जिल्ह्यातील आळेफाटा येथे जाऊन सर्व रोपे आणली होती. त्या रोपांची लागवड दोन दिवस मजूर घेऊन केली आणि त्यानंतर दीड महिन्याने मळा फुलण्यास सुरुवात झाली आहे.


यावर्षी वेखंडे यांच्या शेतात लाल कांद्याची शेतीदेखील करण्यात आली आहे. तर तूर, मूग, वाल, हरभरा कडधान्य यांची शेती हि विशेष प्रसिद्ध असून, त्यांच्या शेतातील कडधान्य नवी मुंबईत विक्रीसाठी जात असतात. या सर्व शेतीसाठी विनय वेखंडे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी छाया यांचे मोठे योगदान दिसून येत आहे. तर कृषी विभागाचे सर्व अधिकारी त्यात तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, कृषी पर्यवेक्षक व्हायसे, कृषी सहायक दत्तू देवकाते यांचे मार्गदर्शन सतत लाभत असते. तर कर्जत पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडून कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे आणि सहायक कृषी अधिकारी अभिजित खैरे यांच्याकडून सतत मार्गदर्शन मिळत असते.

बाजारपेठ
विनय वेखंडे यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला हा बागेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जतच्या बाजारात हॉटेल्समध्ये दररोज सायंकाळी उद्याच्या भाज्यांची ऑर्डर घेतली जाते आणि त्यानंतर सकाळी दहाच्या आधी सर्व भाज्या पोहोच केल्या जातात. त्याचवेळी पालेभाज्या या गावातच विक्री होत असून, अनेकदा घरी शिजविण्यासाठीदेखील पालेभाज्या शिल्लक नसतात.

प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी यांच्याकडून कृषी विभागालादेखील नवनवीन शिकायला मिळते. त्यात विनय वेखंडे आणि छाया वेखंडे यांनी नावीन्यपूर्ण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना शेती पिकासाठी कृषी विभागाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामधून अनुदान आणि मार्गदर्शनदेखील केले जात आहे.

दिनेश कोळी, मंडळ कृषी अधिकारी
Exit mobile version