| कर्जत | वार्ताहर |
कल्याण येथून लोणावळा येथे निघालेली फोर्ड कंपनीची डटसन गाडी कर्जत येथील चार फाटा येथे जळून खाक झाली. कल्याण येथील चिकन घर येथे राहणारे किरण मोतीराम भोईर हे फोर्ड कंपनीच्या डटसन गाडीतून (एम एच 04 -जी जे 9733) आपल्या शेजारी राहणारे रजनीश चौबे यांना लोणावळा येथे डायलिसिससाठी घेऊन चालले होते. परंतु, कर्जत चार फाटा येथे आल्यावर गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला म्हणून किरण भोईर यांनी बोनेट उघडले, तर गाडीच्या इंजिनमध्ये थोडासा पेट घेतला होता. बघता-बघता गाडीने अधिकच पेट घेतला. ही घटना सायंकाळी साडेपाच सुमारास घडली. गाडीच्या अग्नितांडवामुळे चार फाट्यावरील वाहतूक सुमारे एक तास बंद होती. कर्जत नगरपरिषदेच्या अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले व त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. चार फाट्यावर ट्राफिक जाम झाल्याने कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की व पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले.