कॅनडा स्पर्धेतील विजयाने आत्मविश्वास वाढला

लक्ष्य सेनचा दावा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कॅनडा ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर आत्मविश्वास उंचावला आहे, असे भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने म्हटले आहे. त्याने या मोसमातील पहिलेच जेतेपद पटकावले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. लक्ष्य सेन याला मागील वर्षी नाकाच्या दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर आठ महिने तो बॅडमिंटनपासून दूर होता. 2022 मधील चार स्पर्धांमध्ये तो पहिल्या फेरीतच गारद झाला. 2023 मधील सुरुवातीच्या स्पर्धांमध्येही त्याला सुमार कामगिरीमधून जावे लागले.

नाकाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर चांगला सराव होत होता, पण आजारपणामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली होती. शारीरिकदृष्ट्‌‍या कमकुवत झालो होतो. माझ्या क्षमतेच्या 100 टक्के खेळू शकत नव्हतो. ऑल इंग्लंड स्पर्धेसाठी चांगला सराव झाला होता, पण त्यामध्येही अपयशी ठरलो. असे तो म्हणाला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर कोरियाचे प्रशिक्षक योंग यु यांच्यासोबतचा करार संपला. त्यानंतर अनुप श्रीधर व डेकलाईन लेईटायो यांच्या मार्गदर्शनात सराव करू लागलो. सरावाची पद्धतही बदलली. विमल कुमार व माझे वडील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे सध्या सर्व काही सुरळित सुरू आहे. ऑलिंपिक पात्रता फेरी होणार असल्यामुळे पुढेही माझ्याकडून चमकदार कामगिरी व्हायला हवी, असे तो विश्वासाने म्हणाला.

आशियाई दौऱ्यातील चार स्पर्धांमुळे लक्ष्यच्या खेळात आमूलाग्र बदल दिसून आला, त्यामुळे कलाटणी मिळाली. थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत त्याने प्रवेश केला. त्याच्या फटक्यांची निवड उत्तम होत आहे.

अनुप श्रीधर, प्रशिक्षक

ऑलिंपिक पात्रता फेरीला मे महिन्यापासून सुरुवात झाली. पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी पुरेसा वेळ माझ्याकडे आहे; मात्र यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला असे मी म्हणणार नाही. कॅनडा ओपनच्या जेतेपदामुळे आत्मविश्वास कमावला आहे, पण आगामी मोसमात दुखापतींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीन.

लक्ष्य सेन, बॅडमिंटनपटू
Exit mobile version