प्राणीमित्रांच्या सतर्कतेने भेकराला जीवदान

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान हे घनदाट जंगलाने वेढलेले एक टुमदार पर्यटनस्थळ आहे. घनदाट जंगलामुळे साहजिकच येथे जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे. अशातच जंगलातून थेट मानववस्तीमध्ये भेकर दाखल झाले. त्याच्या मागे कुत्रे लागले होते. अखेर येथील प्राणीमित्रांनी शिताफीने त्याची सुखरूप सुटका करून त्याला जीवदान दिले.

बुधवारी हार्ट पॉईंटकडून भरधाव वेगाने एक जंगली भेकर इंदिरा गांधी नगर विभागातील भर वस्तीत घुसले. त्याच्या मागे भटक्या कुत्र्यांचा कळप लागला होता. ते आपला जीव वाचवत सैरावैरा पळत होते. अखेर उंच उडी घेऊन येथील उद्यानामध्ये ते गेले. तेथे असलेले प्राणी मित्र केतन रामाणे, कोंडीबा आखाडे, राजेंद्र देशमुख यांनी उद्यानाचे गेट बंद करून तिथेच त्याला पकडले व कुत्र्यांना उद्यानाच्या आत येऊ न देता बाहेरून हुसकावून लावले. त्याची तपासणी केली असता काट्यातून वाट काढताना काटेरी झुडपे लागून त्याच्या तोंडातून व पायातून रक्त येत होते. त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन द्वारे माहिती दिली. वनपाल राजकुमार आडे, अंतेश्वर भांगे, बबलू शिंगाडे त्यांनी त्याला उचलून पशु संवर्धन विभागाच्या दवाखान्यात नेले. तिथे त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

Exit mobile version